पशुसंवर्धन विभागाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना; ९४ हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरण

बारामती (बारामती झटका)
लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून आज अखेर ९४ हजाराहून अधिक पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांवर लंम्पी आजारसदृश्य लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण १ लाख २० हजार २६१ गोवर्गीय पशुधन असून त्यापैकी ९४ हजार ७०७ इतक्या पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे, उर्वरित पुशधनांना लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. लम्पी आजारग्रस्त जनावराची संख्या एकूण ४६ असून उपचाराअंती बरे झालेली ३१ तर ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच उर्वरित ११ जनावरांवर उपचार सुरु आहेत. दवाखान्यात २० हजार लसीचा साठा असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत आहे.

लम्पी आजाराविषयी
कॅप्री पॉक्स विषाणूपासून गाय, वासरे, बैल गोवर्गीय जनावरांना लंम्पी आजाराचा संसर्ग होतो. डास, माशा, गोचीडापासून या आजाराचा प्रसार होते. आजारी जनावरांच्या अंगावर गाठी, ताप, डोळे व नाकातून स्राव, वजन कमी होणे, दुधात घट अशी लक्षणे आढळून येतात. या कालावधीत जनावरांचे विलिगीकरण करुन घ्यावे, त्यांना शुद्ध, सकस आहार देण्यात यावा, आजारी जनावरांची विशेष काळजी घ्यावी. लम्पी आजाराबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत असून पशुपालपालकांनी याचा लाभ घ्यावा.
निरोगी जनावरांचे लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता व पाण्याची डबकी असल्यास किटकनाशकांची फवारणी, गोचीड प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. अधिक माहितीकरिता पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ (संपर्क क्रमांक ९४२३०२००५३) आणि पशुधन पर्यवेक्षक राहुल हगारे (संपर्क क्रमांक ९७६७१५१७१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



