पेट्रोलपंपावरील दरोड्याचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड
वरूड (बारामती झटका)
वरूड-कुरळी (ता. अमरावती) मार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकून ५ लाख ३२ हजार ३७९ रुपयांची रोकड लुटणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा व वरूड पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनेनंतर काही तासांतच अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे. पेट्रोलपंपावर काम करणारा कर्मचारीच या दरोड्याचा मास्टर माइंड निघाला. ही घटना मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी पहाटे घडली होती.
प्रशिक सुभाष दंडाळे (२६, रा. कुरळी, वरूड), मयूर राजकुमार ठाकरे (२१), सूरज उर्फ सुधीर प्रभाकर घोरपडे (२०) व डिग्या उर्फ दिगंबर श्यामराव राऊत (२२, रा. सुरळी, वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
वरूड येथील रहिवासी रामेश्वर नागदिवे यांचा कुरळी मार्गावर पेट्रोलपंप आहे. मंगळवारी पहाटे अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी त्यांच्या पेट्रोलपंपावरील कॅबिनमध्ये खिडकीतून प्रवेश केला. दरोडेखोरांनी कॅबिनमध्ये झोपलेल्या पेट्रोलपंपावरील तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करीत त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर कपाटातील ५ लाख ३२ हजार ३७९ रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
याप्रकरणी पेट्रोलपंपावरील कर्मचारी शंकर संपतराव दंडाळे (रा. मेंढी, वरूड) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आरोपींचा तत्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपासासाठी वरूड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची चार संयुक्त पथके तयार करण्यात आली. तपासात पेट्रोपंपावर काम करणारे व घटनेच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी प्रशिक दंडाळे याच्या कथनात वेळोवेळी विसंगती आढळून आली. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.