पोलिसांच्या बंदोबस्तात मनोज जरांगे पाटील मुंबईला निघणार

अंतरवाली (बारामती झटका)
मराठा आरक्षणासाठी आंदोलक आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीवर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच, अशी भूमिका घेतली होती.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील सकाळी अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील शेकडो वाहने आणि युवक अंतरवालीत दाखल झाले आहेत. यामुळे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

जालन्यामध्ये पोलिसांनीसुद्धा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते तिथूनच आमरण उपोषण सुरु करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर या पायी पद यात्रेवर राहणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.