प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा-उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी
बारामती (बारामती झटका)
महिला शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून लघु कृषीपूरक व्यवसाय उभारावे, याकरीता महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी केले.
मौजे निरावागज येथे हरभरा पिकाबाबत आयोजित ‘महिला शेतीशाळा’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी सुभाष बोराटे, कृषी पर्यवेक्षक संतोष पिसे, प्रतापसिंह शिंदे, कृषी सहाय्यक ज्योती गाढवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
श्री. शिंदे यांनी हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले, तसेच सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन केले. हरभरा पीक क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देवून ट्रॅप, पक्षी थांबे, चिकट सापळे, सापळा पिके, आंतरपिके याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. चौधरी यांनी शेतकरी कविता भोसले यांना महाडिबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत ‘रोटावेटर’ या औजाराविषयी माहिती घेतली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पापड उद्योग व्यवसायास भेट देऊन मार्गदर्शनही केले.
मंडळ कृषी अधिकारी श्री. सुभाष बोराटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. या शेती शाळेसाठी निरावागज येथील जिजामाता महिला शेतकरी गट, अहिल्या महिला शेतकरी बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन संतोष पिसे कृषी पर्यवेक्षक व श्रीमती ज्योती गाढवे कृषी सहाय्यक निरावागज यांनी केले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.