प्रशासन मौन का बाळगतेय ? न्यू फलटण शुगर डिस्टलरीतील ईटीपी–ईव्हीए अभावाबाबत थेट सवाल

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लवकरच तक्रार करणार – वसीम इनामदार
काळज (बारामती झटका)
न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड डिस्टलरी डिव्हिजन, सुरवडी येथील प्लांटमध्ये ईटीपी (Effluent Treatment Plant) व ईव्हीए / ईव्हॅपोरेशन प्युरिफिकेशन प्लांट अस्तित्वात नसल्याची शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. असे असताना या प्रकरणाची प्रशासनाने अथवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कोणतीही अधिकृत चौकशी केली आहे का ?, हा थेट प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
डिस्टलरी उद्योगातून निर्माण होणारे सांडपाणी व स्लज प्रक्रिया न करता टाकणे हे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन ठरते. मग ईटीपी व ईव्हीए प्रणालीशिवाय स्लजची निर्मिती नेमकी कशा पद्धतीने केली जाते ?, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे का, की याकडे दुर्लक्ष केले जात आहे ? अजून एक महत्त्वाचा सवाल असा की, हा प्लांट ईटीपी व ईव्हीए फॅसिलिटीशिवाय गेली तब्बल दहा वर्षे कसा चालू आहे ?, यासाठी आवश्यक परवाने देताना नियमांची पूर्तता तपासली गेली होती का ?, की केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष स्थितीकडे डोळेझाक करण्यात आली ?
तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत या बाबत कोणती ठोस कारवाई का केलेली नाही ? तपासणी अहवाल आहेत का ? नोटिसा देण्यात आल्या आहेत का ? आणि दिल्या असतील तर त्यावर पुढील कारवाई का झालेली नाही ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्लांटला कोणतीही मूकसंमती, तात्पुरती परवानगी किंवा विशेष सवलत दिली आहे का ? तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनाची या संपूर्ण प्रकरणाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मुकसंमती आहे का ? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पर्यावरण, शेती, भूजल व नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित इतका संवेदनशील मुद्दा असताना प्रशासनाचे मौन अनेक शंका निर्माण करणारे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी स्पष्ट खुलासा करून वस्तुनिष्ठ माहिती जनतेसमोर मांडावी, तसेच आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात लवकरच सामाजिक कार्यकर्ते वसीम इनामदार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांची पुराव्यासहित भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच वेळप्रसंगी केंद्रीय मंत्री भारत सरकार श्री. भूपेंद्र यादव यांचीही भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड डिस्टलरी डिव्हिजन, सुरवडी या प्लांटचे अजून बरेच विषय शेतकरी व सर्वसामान्यांना त्रासदायक असणारे आहेत. त्यावर सुद्धा भविष्यात लवकरच आवाज उठवण्यात येईल असेही सामाजिक कार्यकर्ते वसीम इनामदार यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



