‘प्रेरणाशक्ती माता’ हा ग्रंथ, क्षेत्रीय इतिहासाचे पहिले पान …. – डॉ. श्रीपाल सबनीस
मळोलीतील प्राथमिक शिक्षिका यांच्या मृत्युनंतर ३० वर्षांनी तयार झाला ३०० पानी ग्रंथ
अकलूज (बारामती झटका)
‘प्रेरणाशक्ती माता’ हा ग्रंथ म्हणजे केवळ कौसल्या महादेव रोकडे यांचा गौरव नसून शिक्षिका असलेल्या सर्व मातांचा गौरव आहे. काळजाला भिडणारी मनोगते या ग्रंथात आहेत. हे केवळ रोकडेबाई यांचे चरित्र नसून मळोली गावाचे चरित्र आहे. तेथील जीवन शिक्षण मंदिर या शाळेचे चरित्र आहे. हा ग्रंथ म्हणजे क्षेत्रीय इतिहासाचे पहिले पान आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या वारशाचे दर्शन घडवणारा ग्रंथ आहे’, असे मत ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ते अकलूज येथे कांतीलाल सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या ’प्रेरणाशक्ती माता – कौसल्या महादेव रोकडे’ या स्मृतिगौरव ग्रंथाचे प्रकाशन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
कौसल्या महादेव रोकडे उर्फ माता या प्राथमिक शिक्षिका होत्या. मळोली येथे १९६६ ते १९८८ या काळात काम करीत होत्या. त्यांचे निधन २१ एप्रिल १९९४ ला झाले. मृत्युनंतर त्यांचे विद्यार्थी, सहकारी यांनी ३०० पानाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्या पार्श्वभूमीवर ‘प्रेरणाशक्ती माता’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रदीप आवटे व डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. साहित्यवेल प्रकाशन सातारा व रोकडे, करमाळकर व बाबर परिवार यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. मळोली येथील माता यांचे विद्यार्थी संपादक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व माता यांची नात सौ. मीनल अमोल उनउने यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. यावेळी शरद करमाळकर, डॉ. रविंद्र रोकडे, कृष्णा चिंचकर, अरुणा करमाळकर, प्रा. डॉ. बाळासाहेब घोरपडे, प्रताप गुरव, अमोल उनउने, सम्यक खवळे, श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
या ग्रंथाचे महत्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले की, गावागावात असे ग्रंथ तयार व्हायला हवेत. पायाभूत शिक्षण, सामाजिक जाणीव या ग्रंथातून कळते. चौथ्या पिढीपर्यंतचा इतिहास या ग्रंथात आहे. आजकाल रामाचा आदर्श सगळे स्वीकारतात पण रामाच्या आईचे कौसल्येचे मंदिर कोठे आहे ? खरे तर हे पुस्तक कौसल्यामातेचे खरे मंदिर आहे. या कार्यक्रमात माता यांचे सहकारी यांना शिक्षक जीवन गौरव सन्मान देऊन आपल्याला मोठे पुण्य मिळाले आहे. आयुष्याची संध्याकाळ या पुरस्काराने समाधानी जाणार आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या उपेक्षितांना आपण न्याय दिला नाही, अशा वर्गातून येऊन इतके चांगले संपादन प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे. ब्राह्मण, ब्राह्मणेतर अशी भूमिका न घेता आपल्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान इथे झाला आहे. अत्यंत विवेकवादी भूमिका या ग्रंथाची आहे. अशा प्रकारे राष्ट्र निर्मिती, गाव निर्मितीच्या कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांच्या विषयी कृतज्ञता या ग्रंथात आढळते. मळोली गावच्या शाळेतील राष्ट्रीय एकात्मतेच्या वारशाला मी वंदन करतो. रोकडे बाई या गावच्या माता झाल्या. माणुसकी हाच या मातेच्या आयुष्याचा सारांश आहे. यात लेखकांचा, संपादकांचा कोणताही स्वार्थ मला आढळत नाही. कृतज्ञता व्यक्त करायची, गावची, आपली कहाणी सांगायची, हेच या ग्रंथाचे प्रयोजन आहे. आताच्या काळात महाराष्ट्रात मला असा ग्रंथ पहायला मिळालेला नाही. आजकाल घरातले लोक देखील म्हाताऱ्या माणसांना विचारत नाहीत. या काळात शिक्षकांचे सत्कार केल्याने त्यांना समाधान तर मिळाले पण त्यांचे आयुष्य देखील वाढणार आहे. शिक्षकांच्या विषयीचे ऋण कृतज्ञता व्यक्त करून फेडणे हेच कर्तव्य आहे. आज समाजात चांगुलपणाचे हॅमरिंग करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, अलीकडच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे, अशा काळात आपल्या रोकडेबाई यांच्या मृत्यू होऊन ३० वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या कार्याची, प्रेमाची, माणुसकीची आठवण ठेवून प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व मीनल अमोल उनउने यांनी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांची १०० हून जास्त मनोगते संकलित करून ‘प्रेरणाशक्ती माता’ हा कौसल्या महादेव रोकडे स्मृतीगौरव ग्रंथ संपादित केला आहे. गावातील बदलाचे दर्शन घडवले आहे, हे विलक्षण व दुर्मिळ असे कार्य आहे. गावातील बदलाचे खरे काम शिक्षिका, नर्स,अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या चार बहिणी करीत असतात. एक शिक्षिका अनेक पिढ्यांचा उद्धार करत असते. फुले-शाहू-आंबेडकर यांनी आणलेली शिक्षणाची गंगा खेडोपाडी शिक्षकांनी पोहोचवली. रोकडेबाई यांनी सावित्रीबाई यांचा वारसा पुढे चालविला. खरी शाळा ही चार भिंतीत नसते तर वर्गातील साचेबंद जीवनाच्या भिंती पाडून खरे शिक्षक माणुसकीचे संस्कार करून विद्यार्थ्यांना जगाशी जोडत असतात. रोकडेबाईनी पहिलीच्या वर्गाला शिकवून मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला. त्यांनी मातीत मळलेल्या अनेक जीवांना शिक्षणाचा मार्ग दाखवला म्हणूनच आजही त्यांनी निर्माण केलेल्या इमारतीना कस्तुरीचा सुगंध येतो, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत ’प्रेरणाशक्ती माता’ या ग्रंथाच्या संपादक मीनल अमोल उनउने यांनी केले. प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय करून देत संपादक डॉ. सुभाष वाघमारे यांनी ग्रंथ निर्मितीत सहकार्य करणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कौसल्या महादेव रोकडे यांचे सहकारी उद्धव जाधव, गिरीधर सुरवसे, सुलोचना कांबळे-सूरवसे, वासुदेव जोशी, पांडुरंग जाधव, महादेव भिंगे, नरहरी भस्मे, रोहिणी फाटक, अरुणा करमाळकर, महानंदा गुरव, सोमनाथ ढोले, प्रभावती कोरे इत्यादीना साहित्यवेल प्रकाशन सातारा यांचेकडून शिक्षक जीवन गौरव सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दिवंगत शिक्षक प्रकाश आवेकर यांच्या पत्नी पद्मा आवेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अमोल अशोक उनउने यांनी ग्रंथनिर्मितीसाठी सहयोग दिल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रेरणाशक्ती माता कौसल्या महादेव रोकडे स्मृतीगौरव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अरुणा करमाळकर, माधुरी टकले,अनुज टकले, महादेव भिंगे, जयंत कलढोणे, प्रा. डॉ. बाळासाहेब घोरपडे, प्रभावती कोरे इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. मळोली येथील ग्रामस्थांच्या वतीने संपादक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व मीनल उनउने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्यक शाक्यरत्न यांनी केले तर आभार भाग्यश्री करमाळकर यांनी मानले. या कार्यक्रमास मळोली, माळेवाडी, मांडवे, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शिक्षक, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.