‘प्रेरणाशक्ती माता’ या ग्रंथाचे अकलूजमध्ये प्रकाशन
डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. प्रदिप आवटे यांची उपस्थिती
सातारा (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, या गावी १९६७-६८ ते १९८८ पर्यंत जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका कौसल्या महादेव रोकडे उर्फ माता यांचे निधन दि. २१ एप्रिल १९९४ रोजी झाले असले तरी आज त्यांच्या निधनानंतर ३० वर्षांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘प्रेरणाशक्ती माता – कौसल्या महादेव रोकडे’ स्मृतिगौरव ग्रंथ संपादित केला आहे. आपले गाव, आपल्या गावचा निसर्ग, आपल्या गावचे संस्कारशील शिक्षक यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रंथ एक ऐतिहासिक ग्रंथ स्वरूपाचा ग्रंथ असून या गावातील मातांचे विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराच्या भाषामंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व माता यांची नात सौ.मीनल अमोल उनउने यांनी हा संपादित केला आहे. साहित्यवेल प्रकाशन सातारा या प्रकाशनाने तयार केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व राज्यातील एक वरिष्ठ आरोग्य अधिकारी, कवी व लेखक डॉ. प्रदीप आवटे यांचे हस्ते, अकलूज येथील कांतीलाल सांस्कृतिक भवन, यशवंतनगर, अकलूज येथे शनिवार दि. १८ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता होत असल्याचे आयोजक सौ. अरुणा शरद करमाळकर, डॉ. रविंद्र रोकडे व अलका सुधीर बाबर यांनी कळविलेले आहे.
कौसल्या महादेव रोकडे यांचे माहेर होते सांगोला. तिकडचे मूळ नाव कौसल्या निवृत्ती दौंडे तर, पती महादेव रोकडे हे पिलीवचे. पती महादेव रोकडे यांच्याबरोबर मांडवे या गावी संसार करत करतच त्यांनी स्वतःच्या मुलांचा सांभाळ करीत शिक्षण घेतले आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून १९६७-६८ काळात त्यांची मळोली येथे नियुक्ती झाली. दोघे पतीपत्नी यांनी समरस होऊन गावातील अनेक मुलांना मनापासून ज्ञानदान केले. त्यात कौसल्या महादेव रोकडे यांच्या उत्साही, कष्टाळू, स्वावलंबी, श्रद्धाशील, निस्वार्थी, प्रेमळ, परखड, उदात्त, काटकसर, व मनमोकळ्या स्वभावामुळे व प्रभावी संवाद पद्धतीमुळे मुलांवर आदर्श संस्कार झाले. लोकांशी प्रगतीचा व हिताचा संवाद करीत असल्याने आणि आईसारखेच प्रेम देत असल्याने त्यांना गावातील मुले ‘माता’ म्हणू लागली. पुढे गावातील लहानथोरही त्यांना ‘माता’ याच नावाने बोलू लागले. १९८८ पर्यंत माता मळोली येथे होत्या. या २० वर्षाच्या काळात जीवन शिक्षण मंदिर, मळोली या शाळेत त्यांनी व त्यांच्यासोबतच्या शिक्षकांनी अनेक मुलांना घडविले. पुढे १९८८ नंतर त्या माळेवाडी येथे बदली होऊन गेल्या. पुढे पतीचे निधन झाले. त्यांनी आपल्या स्वतःची मुले उच्चशिक्षित बनवलीच पण अनेक मुलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रेरित केले. शैक्षणिक सेवाकाळ पूर्ण व्हायच्या आतच एका आजाराने २१ एप्रिल १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
आज त्यांना जाऊन ३० वर्षाचा काळ निघून गेला तरीही त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या हृदयात मातांच्या अनेक आठवणी तेवत राहिल्या. नीतीचा दिवा, मनात सत्य, अहिंसा, सचोटीचे संस्कार करत राहिलेल्या मातांची आठवण संवेदनशील विद्यार्थ्यांना तीव्रतेने झाल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांनी मातांच्या कार्याची आठवण रहावी व जीवन शिक्षण मंदिर या शाळेतील शिक्षकांचे योगदान कळावे यासाठी ग्रंथ प्रकाशित करायचे ठरवले. आणि जवळपास दोन वर्षे संपर्क करून मातांचे सहकारी शिक्षक, विद्यार्थी, कुटुंबीय, ग्रामस्थ यांचेकडून आठवणी संकलित केल्या.
त्यांच्या या आठवणी म्हणजे हे आधुनिक लीळाचरित्र. भक्तीपेक्षा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या, प्रेमाने गाव जोडण्याच्या, मनातील सुख दुःखाचे दिवस सांगण्याच्या भावनेने जवळपास १०० पेक्षाही जास्त विद्यार्थी व शिक्षक लेखनात सहभागी झाले आहेत. इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग, माणूसपण या ग्रंथात व्यक्त झाले आहे. अशा या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Wonderful perspective! The points you made are very enlightening. For further information, visit: DISCOVER MORE. Excited to hear your views!
This article was a great read! It managed to break down complex ideas into easily understandable concepts. Im really interested in seeing how this topic evolves. For those who want to delve deeper, check out my profile by clicking on my nickname!