पुणे विभागात उत्कृष्ट अधिकारी म्हणून वैभव नावडकर यांची निवड
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सन्मान
बारामती (बारामती झटका)
बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विभागातून त्यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. महसूल पंधरवड्याच्या सांगता समारंभानिमित्त पुण्यातील विधानभवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर यांनी आर्थिक वर्ष २०२३ ते २०२४ या कालावधीत बारामती उप विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी या कालावधीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाअंतर्गत पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते सराटी या टप्प्याकरीता एकूण ६५ निवाडे केले असून याकरीता १९४ कोटी ६७ लाख रुपये बाधितांच्या खात्यात जमा करण्याचे काम केले. बारामती-फलटण-लोणंद या नवीन रेल्वे मार्गाकरीता १२ गावातील भूसंपादनाची कार्यवाही करुन १७ कोटी २१ लाखाहून अधिक नुकसानभरपाईची रक्कम बाधितांना अदा केली. याशिवाय विविध ३८३ अर्धन्यायिक प्रकरणात अंतिम निकाल दिले आहेत.
बारामती उपविभागात १७ हजार २२३ जातीचे दाखले तर १२ हजार २९७ उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे असे एकूण २९ हजार ५२० इतक्या दाखल्याचे वितरण केले आहे. शाळा, महाविद्यालय तसेच गावपातळीवर विविध दाखले उपलब्ध करुन देण्याकरीता बारामती तालुक्यात ५ व इंदापूर तालुक्यात ८ अशी १३ विशेष शिबीरे आयोजित करुन त्यात ९ हजार ९०७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ अंतर्गत एकूण ६ ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
टंचाईच्या काळात बारामती तालुक्यात ३० व इंदापूर तालुक्यात ३२ गावात असे एकूण ६२ टंचाईग्रस्त गावाला समक्ष भेट देऊन टंचाईची पाहणी केली. त्यानुसार त्यांनी बारामती तालुक्यात ३५ आणि इंदापूर तालुक्यात ६७ असे एकूण १०२ टँकर तात्काळ सुरु केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामती विधानसभेतही उत्कृष्ट कामकाज केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाप्रमाणे बारामती उप विभागात विविध पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून त्याला तातडीने गती देण्याचे काम श्री. नावडकर करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
lamerler olmez