राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा अलर्ट

मुंबई (बारामती झटका)
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा देखील चढताना दिसला.
राज्यात मागील १५ दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. आज IMD ने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, तर तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले.
राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले…
अजूनही अवकाळीचे ढग कायम आहेत. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे पाऱ्यात घट झाली होती. मात्र, आता काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये परत एकदा अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचा इशारा हा हवामान खात्याकडन देशात आला आहे.
पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पार
राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याचेही बघायला मिळाले. जळगाव आणि अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज हवामान खात्याने आठ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
राज्यात हवामान ढगाळ असल्याने उकाडा वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय. आता गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, नागपूर याठिकाणी वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळीचे संकट कायम
बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर कोकणात देखील हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
शेतकऱ्यांना सल्ला
घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.