राज्यातील पाणंद रस्ते रॉयल्टी मुक्त – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कुर्डू प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल, कुर्डूच्या आंदोलनाचा ४१ हजार गावांना फायदा
कन्हेरगांव (बारामती झटका)
कुर्डू (ता. माढा) येथे होत असलेल्या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झालेले मुरूम उत्खनन प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. कुर्डू येथील मुरूम उत्खनन केलेलं कायदेशीर की बेकायदेशीर याच्यावरती राज्यभरात चर्चा झाली. अखेर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की, राज्यातील गावांमध्ये पाणंद रस्ते दुरुस्त करताना जो मुरूम लागेल त्या मुरमाला रॉयल्टी लागणार नाही. त्याचा फायदा राज्यातील ४१००० गावातील रस्त्यांना होणार आहे.
माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उत्खनन होत असल्यावरून करमाळ्याच्या डीवायएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची क्लिप राज्यभर गाजली. त्यानंतर प्रशासनाने कुर्डूमध्ये मुरूम उत्खनन करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर कुर्डूकरांची एकी राज्याने पाहिली आणि कुर्डूकरांनी गाव बंद ठेवत सदर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध व्यक्त केला. गावातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली. सदर आंदोलनाची आगीची झळ राज्याच्या मंत्रालयाला पोचली आणि महसूलमंत्र्यांनी येथून पुढे पाणंद रस्त्यांसाठी जो मुरूम उत्खनन होईल त्याला रॉयल्टी भरायची आवश्यकता नाही, असे घोषित केले.

कुर्डूच्या एकजुटीचा विजय
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्ते दुरुस्त करताना जो मुरूम लागेल त्या मुरुमाला रॉयल्टी लागणार नाही, अशी घोषणा नुकतीच केली आहे. एखादं गाव पाणंद रस्त्यासाठी मुरूम उत्खनन करत असताना त्या गावाला बदनाम न करता त्या गावाची मागणी काय आहे? गाव कशासाठी मागणी करतेय, याचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारने कुर्डू आंदोलनाची दखल घेतली आणि कुर्डूंच्या एका आंदोलनामुळे राज्यातील सर्वच गावातील पाणंद रस्त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. – संजयमामा शिंदे, माजी आमदार
आमच्या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली
कुर्डू मुरूम उत्खनन प्रकरणामध्ये कुर्डूला बदनाम करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला होता, त्यांना कळून चुकले असेल की, आम्ही जे आंदोलन करत होतो ते त्या गावातील सार्वजनिक रस्त्यांसाठी करत होतो, आमच्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचे आम्ही कुर्डू ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच या प्रकरणामध्ये आम्हाला राज्य सरकारमध्ये संवाद घडवून ज्यांनी आणला ते माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. – अण्णासाहेब ढाणे, माजी सरपंच, कुर्डू

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



