ताज्या बातम्याराजकारण

रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपातून लवकरच होणार हकालपट्टी; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे स्पष्ट संकेत

मुंबई (बारामती झटका)

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, त्यांची भाजपतून लवकरच हकालपट्टी होईल, अशी मााहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी यापूर्वी म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी केली आहे. केदार-सावंत यांच्यापाठोपाठ कल्याणशेट्टी यांनीही शिफारस केल्याने मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.

विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर यांच्याकडून राम सातपुते यांना पराभव झाला होता. त्या पराभवानंतर सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात शस्त्र उपसले आहे.

माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले.

भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली होती.

दरम्यान, सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी राम सातपुते यांची तक्रार आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेली शिफारस याबाबत माहिती देत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.
(सरकारनामा साभार)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

15 Comments

Leave a Reply

Back to top button