रेल्वेचे खासगीकरण होणार नाही – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेत रेल्वे दुरुस्ती विधेयक मंजूर
नवी दिल्ली (बारामती झटका)
रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी असून तिचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी स्पष्ट केले. रेल्वेच्या खासगीकरणाबाबत विरोधक खोटे विचार पेरत आहेत. यापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याच दरम्यान रेल्वे दुरुस्ती विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे. रेल्वेत युवकांना नोकरीच्या संधी देण्यासाठी ५८,६४२ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच काश्मीर ते कन्याकुमारीला जोडणारा प्रकल्प राबवला जात असून या मार्गावर पुढील चार महिन्यांत रेल्वे धावणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
गेल्या चार डिसेंबर रोजी लोकसभेत सादर झालेल्या रेल्वे दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत सहभाग घेत विरोधी पक्षांनी रेल्वेचे खासगीकरण केले जात असल्याचा आरोप केला. त्यास उत्तर देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेचे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांवर लक्ष आहे. देशभरातील गाड्यांना १२,००० जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. १.२३ लाख किमी लांबीचे जुने रूळ बदलण्यात आले आहेत. यात, नवतंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला. पण याउलट विरोधक रेल्वेच्या खासगीकरणाचा खोटा प्रचार करीत आहेत. विरोधकांचा संविधानाविषयीचा खोटा दिखावा अपयशी ठरला आहे. म्हणून त्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. पण सुरक्षा व रेल्वे या दोन गोष्टींना राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे, असे उत्तर अश्विनी वैष्णव यांनी दिले. रेल्वे अपघात टाळणे व प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही अश्विनी वैष्णव यांनी दिली. गत १० वर्षांत रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलला. २००० उड्डाणपूल व भूयारी मार्ग बनवले. यूपीए सरकारच्या तुलनेत हे तिप्पट काम आहे. रेल्वेत ३.१० लाख शौचालये बनवले.
‘वंदे भारत’ रेल्वे ही ‘आत्मनिर्भर भारत’ची ओळख बनली. गत १० वर्षांत ४४ किमी विद्युतीकरण झाले. ५ लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर, ‘रेल्वे दुरुस्ती विधेयक-२०२४’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक १९०५ सालच्या विधेयकाची जागा घेणार आहे. यात, १९०५ व १९८९ च्या रेल्वे कायद्याला एकत्र करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.