सदाशिवनगर येथे सावता माळी महाराज यांचा समाधी सोहळा संपन्न…

सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर ता. माळशिरस या ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची 729 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी सदाशिवनगर पंचक्रोशीतील सर्व समाजातील भाविक भक्त उपस्थित होते. गेली 19 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे.
एक दिवस अगोदर अरण येथून ज्योत सदाशिवनगर या ठिकाणी आणली जाते. सदाशिवनगर या ठिकाणी आल्यानंतर ज्योतीचे विविध ठिकाणी पूजन केले जाते व संध्याकाळी जागर भजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत ह.भ.प. संगीताताई काटोळे महाराज (पनवेल) यांचे किर्तन झाले. त्यांनी आपल्या कीर्तनात सावता महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेऊन त्यांनी आपल्या जीवनात येऊन भक्तीचा मळा कसा फुलवला हे सांगितले.

महाराष्ट्रातून सर्व पालख्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी येतात. परंतु, संत शिरोमणी सावता महाराज हे विठ्ठलाचे असे एकमेव भक्त आहेत की स्वतः विठ्ठल त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मळ्यात जात होते व आजही विठ्ठलाची पालखी दरवर्षी सावता महाराजांना भेटण्यासाठी आरण या ठिकाणी जात असते व ती परंपरा आजही अखंडित चालू आहे.
सावता महाराज हे कधीही पंढरपूरला न जाता त्यांनी आपल्या आई-वडिलांत, प्राणी, पक्षात, झाडात व शेतातील मळ्यात देव पाहिला. ते आपल्या शेतातील कामात रमुन जात व आपल्या मुखात कायम विठ्ठलाचे नामस्मरण व भजन करत असत. त्यामुळे त्यांनी हे दाखवून दिले आहे की दर्शन करण्यासाठी कोणत्याही देवळात जाण्याची गरज नाही. आपली फक्त भक्ती चांगली असली पाहिजे व आपण आपल्या आई-वडिलात, मुक्या प्राणी पक्षात व वृक्षात देव पहिला पाहिजे. तो तिथंच सापडल्याशिवाय राहणार नाही.
अशाप्रकारे त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत संगीताताई महाराजांनी चांगल्या प्रकारे कीर्तन करून भक्तगणांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर 12:00 वा. फुलांचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर आलेल्या सर्व भाविकभक्तांना महाप्रसादचे वाटप प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले. यावेळी सदाशिवनगरचे विद्यमान सरपंच मा.श्री. विरकुमार (भैया) दोशी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश राऊत, उपाध्यक्ष दिपक राऊत व कार्याध्यक्ष महेश नाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.