सध्या मुलांच्या बरोबरीने मुलीही प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेत अग्रेसर – केंद्रप्रमुख रमाकांत पवार

श्री संत गाडगेबाबा विद्यालयात महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण
माढा (बारामती झटका)
भारतीय संस्कृती जरी पुरुषप्रधान असली तरी आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुलीही त्यांच्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. एकही क्षेत्र असे उरले नाही की, त्या क्षेत्रात मुलींनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर नावलौलिक कमावला नाही. उलट सध्या काही क्षेत्रात मुलींचाच गुणवत्तेच्या बाबतीत दबदबा दिसून येत आहे. विशेषत: दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनीच गुणवत्तेत बाजी मारली अशा मथळ्याखाली अनेक वेळा बातम्या वाचायला मिळतात. ही बाब महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख रमाकांत पवार यांनी केले आहे.
ते आनंदनगर-मानेगाव, ता. माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या विविध शैक्षणिक स्पर्धांचे बक्षीस वितरण करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तुकाराम कापसे होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.
यावेळी लहान व मोठ्या गटात घेतलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील यशस्वी आर्या बगडे, संस्कृती निकम, श्रावणी घोलप, अनुश्री लटके, वैष्णवी खोत, तृप्ती बगडे, अस्मिता लटके, आदिती भोगे, अनुष्का पवार, मयुरी लटके, आरती पवार, स्नेहा खोत, सिद्धी सुतार या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख रमाकांत पवार व शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी अस्मिता लटके, श्रुती घोगरे, मुख्याध्यापक तुकाराम कापसे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी आरती पवार हिने केले. तर आभार सहशिक्षक सुनील खोत यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख तनुजा तांबोळी, प्रविण लटके, माजी सरपंच शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर, सुनील खोत, तृप्ती कापसे, लहू गवळी, सागर राजगुरू, सोनाली घायतिलक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.



