संगणक परिचालकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे गावगाड्याचा संपुर्ण कारभार होणार ठप्प.
माढा (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनासंलग्नीत माढा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मा. गटविकास अधिकारी श्री. महेशजी सुळे साहेब यांना या समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती मिळावी आणि किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी दि. १७/११/२०२३ पासुन बेमुदत कामबंद आंदोलन करत असलेबाबत निवेदन देण्यात आले. ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पुर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणकपरिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणकपरिचालक अविरतपणे करत आहेत. ग्रामपंचायतीचे ऑनलाईन व ऑफलाईन व इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करुनसुद्धा केवळ ६,९३० हजार रुपये हे या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन मिळते, तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही. संगणकपरिचालक हे सर्व प्रकारची कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या या समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणकपरिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे. त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन देण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर/संगणकपरिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर राज्य संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत आहे, त्याची दखल घेऊन शासनाने यावलकर समितीच्या शिफारशीनुसार डेटा एंट्री ऑपरेटर/संगणकपरिचालक या पदाची निर्मिती करण्यास व किमान वेतन देण्यास ग्रामविकासमंत्री ना. गिरीशजी महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखालील ११ जानेवारी २०२३ च्या बैठकीत मान्यता दिली आहे.
ग्रामविकासमंत्री मा. ना. गिरीशजी महाजन साहेब यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २८ डिसेंबर २०२२ रोजी लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार फाईल वित्त विभागात गेल्यानंतर त्यात काही त्रुटी काढण्यात आल्या. त्यानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मा. विभागीय आयुक्त यांच्याकडून १५ दिवसात अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, १५५ दिवस झाले तरी अद्याप अनेक जिल्हा परिषदानी सदरील अभिप्राय न दिल्याने ग्रामविकास विभागाने त्रुटींची पूर्तता करून परत वित्त विभागास पाठवली नाही. त्यामुळे शासन व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येते.
ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्या ग्रामपंचायत कर्मचार्याना किमान वेतन, कोतवाल, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचे मानधन वाढले आहे. परंतु, शासनाने संगणकपरिचालकांचे मानधनात वाढ न केल्याने संगणकपरिचालकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. हे ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी आमचे बंधुभगिनी आहेत, त्यांच्या मानधनात वाढ झाली याचा आम्हाला आनंद आहे पण आम्हीच काय पाप केले ? अशी भावना संगणकपरिचालकांच्या मनात निर्माण झाली आहे.
तसेच ग्रामविकास विभागाने नव्याने लोकसंख्या निहाय टार्गेटची पद्धत सुरू केली आहे. अनेक ठिकाणी १ ते ३३ नमुने उपलब्ध नाहीत मग ऑनलाईन कसे करायचे ? कोणत्याही प्रकारचे स्वयंघोषणापत्र किंवा इतर दाखल्यांचे मागणी अर्ज ग्रामपंचायतीस आल्यावर तो दाखला देण्यात येतो. परंतु, फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या एंट्री व बोगस प्रमाणपत्र देण्यास csc –spv हि कंपनी संगणकपरिचालकांवर दबाव आणते.
तसेच काम करण्यासाठी संगणक, प्रिंटर आवश्यक असते. संगणकाची मुदत ५ वर्षाची होती, १२ वर्ष झाले तरी ते बदलून दिले नाहीत. प्रिंटरची अवस्था तीच आहे व इंटरनेटचा खर्च संगणकपरिचालक स्वतः करतात. त्यात कंपनीची Mahaegram सारखी महत्वपूर्ण वेबसाइट सुरळीत चालत नाही. अशा अनेक अडचणी असताना ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत निहाय नव्याने टार्गेट सिस्टिम सुरू केली आहे. हे टार्गेट ज्यांच्याकडून होत नाही त्यांना कामावरुन कमी करण्यात येते हे अन्यायकारक आहे. यामुळे प्रमुख न्याय मागण्यासाठी शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर २०२३ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक सर्व प्रकारचे कामे बंद ठेऊन बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.
यावेळी संगणक परिचालक संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष श्री. अमित होनमाने, सचिव श्री. रोहन भोरे, उपाध्यक्ष श्री. गणेश भागवत, उपाध्यक्ष श्री. सचिन सरवदे, खजिनदार आबासाहेब कोळेकर, रमेश बरकडे, अक्षय गुंड, अरविंद गायकवाड, मल्लिकार्जुन लोकरे, तेजस ओहोळ, संतोष उमाटे, महादेव काळे व इतर संगणक परिचालक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.