संघर्षमय जीवनाची ४५ वर्षे…. सौ. लतिका दत्तू यादव
कोंडबावी (बारामती झटका)
कोंडबावी ता. माळशिरस येथील स्वतःच्या तुटपुंज्या शेतीत काबाडकष्ट करून तसेच प्रसंगी शेतमजूर म्हणून दुसऱ्याच्या रानात काम करून स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित देणारे सौ. लतिका व श्री. दत्तू यादव या दांपत्याने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपल्या जिद्द, अपार कष्ट व हिंमतीच्या जोरावर तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या या दाम्पत्याच्या कार्याची दखल घेत पुणे येथील सुसंगत फौंडेशनच्या वतीने त्यांचा आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन गौरव करणार आहे. त्यानिमित्त सौ. लतिका दत्तू यादव यांच्या संघर्षमय जीवनाची थोडक्यात यशोगाथा…
साधारणतः १९७७ दरम्यानचा काळ असावा. आम्ही तिघी बहिणी, तीन भाऊ आणि आई-वडील असा आमचा परिवार होता. त्यात थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते आणि आता आम्हा दोन्ही बहिणींचा नंबर येणार होता. त्यात वडीलांनी स्थळे पाहण्यास सुरुवात केली. आधी दोन नंबर बहिणीचे लग्न जमले नंतर काय वडीलांच्या मनात आले कोणास ठाऊक? जादा खर्च नको म्हणून दोन नंबर बहिणीचे जेथे लग्न जमले होते त्याच घरी माझेही लग्न जमविले. आम्हा दोन्ही बहिणींची एकाच दिवशी लग्ने झाली आणि आम्ही यादव घराण्याच्या सूना म्हणून सासरी कोंडबावी गावी आलो. सासरी परिस्थिती गरीबच होती. रोजचे खायचे वांदे होते. त्यात सासूबाई आमच्या कडक होत्या. काही करायला गेले की, लगेच रागवायच्या, बोलायच्या… आधी रानात जा.. काम करा.. आणि नंतर घरची कामे करा. असे काही दिवस गेले. आणि साधारणतः लग्नाच्या एक वर्षानंतर मला दिवस गेले. त्या दिवसात मला काही खाल्ल्याले पचत नव्हते, काही करायला गेले की अंगात अवसान नसायचे, काही करूही वाटत नसायचे, मन नेहमी उदास असायचे, त्याकाळात मी नेहमी अजारी असायची, उठ बस, उठ बस करीत तसाच दिवस पुढे ढकलायचा. असे कित्येक दिवस चालू होते. हे चालू असतानाच मला पहिला मुलगा झाला. तेव्हा कुठे मला थोडेसे बरे वाटू लागले.
माझ्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. माझ्या आईने पहिल्या मुलाचे नाव सतीश असे ठेवले. घरची परिस्थिती गरीबच होती. शेतामध्ये खूप कष्ट करून आम्ही रोजचे जीवन जगत असे. कामाच्या ओघात पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे ऋतू कधी आले आणि गेले कळतच नव्हते. त्यातच मला दुसरा मुलगा झाला त्याचे नाव सुरेश ठेवले. त्यानंतर माझ्या मनाला हुरहुर लागून राहिली की, आपली परिस्थिती नसतानासुद्धा या दोन मुलांना कसे सभांळायचे, आपली मुलं शिकतील की नाही, आपल्याला रोजचे खायचे वांदे आहेत त्यातून आपली परिस्थिती सुधारेल की नाही, त्यात नवरा आडाणी, त्यांना काही सांगायला गेले तर ऐकून घेत नसे. त्यावेळी सासूबाईंनी आणि नवऱ्याने वेगळा विचार केला आणि मला म्हणाले की, तिसऱ्या वेळेस तुला नक्कीच मुलगी होईल. पण देवाच्या मनात वेगळेच होते, ‘दैवाची खेळी आजपर्यंत कोणालाही कळलेली नाही ती मला काय कळणार होती.’ म्हणून मी पण सासूबाईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तिसऱ्या वेळेसही मला मुलगाच झाला. मुलगा झाल्यानंतर घरचे थोडेसे नाराज झाले, कारण आम्ही ठरविले होती की ह्या वेळेला मुलगी होईल. पण, तसे झाले नाही. असे काही दिवस गेले मी आणि माझ्या आईने त्याचे नाव सुनील असे ठेवले. आता मात्र मला खूप मोठी काळजी लागली. मन सारखे कासावीस व्हायचे. काय करावे काही सूचन नव्हते. कारण, घरी सारखीच कामावरून, पैशावरून भांडणे व्हायची. सासूबाईला सांभाळणे, आडाणी नवऱ्याला सांभाळणे, त्यात नवऱ्याला व्यसन, त्यातून कसेबसे मुलांना खाऊ घालायचे, कधी खायला नाही मिळाले तर उपाशीच झोपायचे.
नवऱ्याचा वेगळा स्वभाव आणि सासूबाईचा वेगळा स्वभाव या सगळ्यांना तोंड देत एक दिवस निश्चय केला की, आपण शेतामध्ये खूप कष्ट करायचे आणि तीनही मुलांना भरपूर शाळा शिकवून मोठे करायचे असा ठामपणे मनाचा पक्का निर्धार केला आणि पहिल्या मुलाला गावामध्येच मराठी शाळेत घातले. त्याचे आजोबा त्याला शाळेत ने-आण करत असे. दिवसभर शेतात खुरपणी करणे, शेतीला पाणी देणे, गवत काढणे, वैरणीची ओझी बांधून घरी आणणे अशी बरीच कामे करीत असत. काम लवकर व्हावे म्हणून कधी शेजाऱ्यांबरोबर पायरा करत असे तर कधी हजेरीत कामाला शेतात जात असे. असे करून थोडीशी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असे. पण काही केल्या परिस्थिती जैसे थे राहात असे. काही दिवसांनी दुसरा मुलगाही शाळेत जाऊ लागला, नंतर दोन वर्षांनी तिसरा मुलगाही शाळेत जाऊ लागला. ह्या तिघा मुलांना त्यांचे आजोबा शाळेत ने-आण करीत असत. असेच काही दिवस गेले. एकत्र कुटुंब असल्यामुळे धाकट्या दीराचे लग्न झाले व अजून कुटुंबात एका व्यक्तीची भर पडली. कष्टाचाही भार जास्त वाढला. कामाचा ताण वाढला. त्यात दीरांची चिडचिड होणे, जावा-जावांमध्ये चिडचिड होणे असे प्रकार होण्यास सुरूवात झाली. कधी-कधी चिडचिडचे रुपांतर भांडणातदेखील होत असे. हे सर्व व्हायला नको म्हणून सासऱ्याने माझा थोरला मुलगा इ.४ थी शाळेत असतानाच सर्वांना अडीच-अडीच एकर जमिनीची वाटणी करून देऊन सर्वांना वेगळे केले. वेगळे राहिल्यानंतर आम्हाला स्वतःचे घरसुद्धा रहायला नव्हते. मग मी माझ्या वडीलांकडून व भावाकडून काही थोडेसे पैसे घेऊन आले आणि त्यापैशातून पत्रे, लाकडी खांब आणून बाजूला कुड असलेले छोटेशे घर बांधले. तेथून पुढील प्रवास काही हलाखीचा गेला. कारण हाती काहीच नव्हते.
शेतातून उत्पन्न निघणार तेव्हाच आम्हाला खायला मिळणार. वेगळे राहिल्यावर नवऱ्याकडे बैलजोडी वाटून आली होती त्याच बैलजोडीच्या जोरावर आम्ही आमची अडीच एकर शेतात कष्ट करू लागलो. त्यातून वेळ मिळाला तर दुसऱ्याच्या शेतात जाऊन पयाऱ्याने नांगरणे, कुळवणे, पेरणी करणे तर कधी पैसे घेऊन ही सर्व कामे करीत असत, असे अनेक कष्टाची कामे करू लागलो. त्यातून थोडे उत्पन्न मिळू लागल्यानंतर आमचा संसार सुखाचा होऊ लागला.
मुले शाळेत जात होती, त्यात थोरला मुलगा थोडासा भांडखोर होता. तो कुणाचे ऐकत नव्हता. त्याला सांभाळणे थोडेसे कठीणच होते. पण त्याचे बापाच्या पुढे काही चालत नसे. शाळेतून काही भांडणाच्या तक्रारी येत होत्या. मला वाटले हा मुलगा शाळा शिकतो का नाही, कोणास ठाऊक? शाळेतून घरी आल्यानंतर रोज मी त्याची हजेरी घेत असे व त्याला समजावून सांगत असे. तू चांगला शाळा शिक, तू शिकला तर तुझे दोन भाऊ पण तुझ्यापाठीमागे चांगली शाळा शिकतील. असे मी कित्येकदा त्याला समजावून, थोडासा दम देऊन सांगत असे. इ.७ वीत गेल्यानंतर त्याच्यात सुधारणा झाली. तो चांगला अभ्यास करून लागला. शाळेतसुद्धा चांगल्या मार्कांनी पास होऊ लागला. तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. मनाला वाटले आता हा मुलागा काहीतरी करेल. इ.७ वी नंतर तो घरापासून लांब ४ कि.मी. पाटीलवस्ती येथील शाळेत जाऊ लागला. इ.१० वी तो चांगल्या मार्कांनी पास झाला. आणि त्याने कॉलेज जीवनात प्रवेश केला. थोडासा हट्टी भांडखोर असल्यामुळे त्याचा थोडासा भांडखोरपणा कमी झाला होता पण, हट्टीपणा त्याचा काही जात नसे.
या हट्टीपणामुळेच इ.१२ वी मध्ये तो नापास झाला. नापास झाल्यानंतर तो त्याच्या एक मित्राला घेऊन घरी आला. कारण त्याला माहित होते की, आपण जर नापास झालेला निकाला घेऊन घरी एकटे गेलो तर, आई आपल्याला नक्की मारणार… म्हणून त्याने ही आयडिया केली होती. तो आणि त्याचा मित्र दोघे घरी आले. घरी आल्यानंतर मी त्याला पाणी दिले, चहा दिल्यानंतर त्याचा मित्र मला सांगू लागला की, तुमचा मुलगा नापास झाला आहे. प्लीज त्याला तुम्ही मारू नका.. हे सांगितल्यावर मला असा काही राग आला होता.. मनात आले त्याचा मित्र येथून जाऊ दे… त्याला ठोकून काढणार म्हणजे काढणार… पण, परत तो सांगूला की तो एकटाच नापास झाला नाही, मी पण नापास झालोय. माझ्यापण घरची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे. हे सर्व सांगून माझी समजूत काढून तासा-दिड तासाने तो निघून गेला. तोपर्यंत मला आलेला राग शांत झाला. खरोखरच मुलगा माझ्या हातून मार खाणार होता परंतु, मित्रामुळे वाचला… त्याचा मित्र निघून गेल्यानंतर मी मुलाकडे पाहिले. आणि सांगितले अरे… आप्पा… तू काय केले हे… आम्ही एवढे कष्ट करून तुला शाळा शिकवतो आणि तू नापास झालास. काही तुला वाटतं का रे.. ‘इथून पुढे मी तुझ्या शाळेला एक पै म्हणून देणार नाही. तुला कशी शाळा शिकायची तशी शिक.. नाहीत तर घरी रानात काम कर..’ मला काही सांगू नकोस, आपल्या घरची परिस्थिती बघोतस ना.. कशी आहे ती? त्याचे एक नाही, दोन नाही तो गुपचूप मान खाली घालून ऐकत होता. हे सर्व रामायण झाल्यावर तो एकच शब्द बोलला, आई… तु मला शाळेला पैसे नको देऊस, मी काम करून शाळा शिकेन. मी हं… केलं आणि त्याला म्हणाले, ‘लय शाळा शिकून धन लावणार हायस.. कळतयं की ह्या निकालावरून…’ एवढे बोलून मी माझ्या पुढील कामाला निघून गेले.
थोड्या दिवसांनी काही त्याच्या मनात आले कोणास ठाऊक… त्याने त्याच्या आजोबाकडे कामाविषयीचे आपले गाऱ्हाणे सांगितले आणि त्याच्या आजोबाने त्याची समजूत काढली… आणि बघू म्हटले. त्याच्या आजोबाकडे स्वतःची एक सायकल होती ते रोज अकलूज ते कोंडबावी हा प्रवास सायकलवर करत असे. या प्रवासात जर सायकल पंक्चर झाली तर, पंक्चर काढणे, हवा चेक करणे, टायर ट्युब बदलणे ही कामे एका खासगी सायकल दुकानात करत असत. तो सायकल दुकानदार त्यांच्या चांगला ओळखीचा होता. त्या सायकल दुकानाचे नाव ‘लकी सायकल मार्ट’ असे होते. त्या दुकानात आजोबांनी त्याला कामाला लावले आणि खराेखरच तो त्या सायकल दुकानात कामला जावू लागला. स्वतःच लवकर उठून, उरकून त्याचे तोच स्वतः पैसे कमवू लागला. सर्व काही गोष्टी त्याचा तोच करू लागला. मग काय त्याच्या मनात आले कोणास ठाऊक त्याने पुन्हा ऑक्टोबरला १२ वी परीक्षेचा फॉर्म भरला.. परंतु, कामाच्या ताणामुळे पुन्हा तो नापास झाला. पुन्हा मी त्याला खवळले. आणि पुन्हा ताे सायकल दुकानात कामला जाऊ लागला. त्याने दोन वेळा इ.१२ वी ची परीक्षा दिली पण.. तो नापासच झाला. पुन्हा काय त्याच्या मनात आले कोणास ठाऊक? त्याने शाळा बदलली आणि नवीन शाळेत प्रवेश घेऊन तो पुन्हा शाळेला जाऊ लागला, भरपूर अभ्यास करू लागला आणि इ. १२ वी तो चांगल्या मार्कांनी पास झाला. पास झाल्यानंतर मी माझ्या वडीलांना (भगवान मुगूटराव पवार (पानीव)) म्हणाले की, आबा.. आता माझ्या पोराची बारावी झाली आहे, त्याला कुठेतरी नोकरीला लावा.. आणि त्यांनी माझा शब्द खाली पडू दिला नाही. आमच्या वडीलांचे आणि माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठीत मोहिते-पाटील घराण्यांशी सलोख्याचे संबंध होते त्यांच्याशी त्यांनी चर्चा करून एका मोठ्या सहकारी संस्थेमध्ये त्याला कामाला लावले. कामाला असतानाचा तो शाळेला पण जायचा, असा त्याचा प्रवास सुरू झाला. याच कालावधी त्याने उच्च महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. (एम.ए. बी.एड्.) आणि आज तो त्याच संस्थेमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
माझा दुसरा मुलगा थोडासा कारी, हट्टी आणि शांत स्वभावाचा होता. तो शाळेत मात्र हुशार होता. पूर्वीच्याकाळी लाईट हा प्रकार जास्त करून खेडेगावामध्ये नसायचा आणि आमचा भाग म्हणजे अगदीच खेडेगाव असायचे. रात्रीचे सात वाजले की सर्वत्र अंधार असायचा. आम्हाला चिमणी लावून स्वयंपाक करावा लागत असे. (चिमणी म्हणजे रॉकेलवर चालणार एक छोटास दिवा) आमचा स्वयंपाक होऊन सर्वांचे जेवण झाल्यानंतर मला तो म्हणायचा.. आई.. मला तेवढी चिमणी दे.. मला अभ्यास करावयाचा आहे. मग मी त्याला रागवायची आणि म्हणायची, त्या चिमणीपासून तू थोडा लांब अभ्यास करत बस.. नाही तर भडका उडेल. तो.. हो.. म्हणायचा आणि चिमणी घेऊन बाहेर पटांगणात अभ्यास करत बसायचा. कधी-कधी तर मी स्वतः त्याच्यापाशी बसून तो काय करतो हे पहात असे. काही वेळेला तर त्याला चिमणी दिली की सांगत असे की, मी इथं स्वयंपाक करत आहे. तू मोठ्याने वाच म्हणजे मला कळेल की तू अभ्यास करतोस की नाही ते. तो.. हो.. म्हणायचा आणि घराच्या बाहेर पटांगणात जाऊन मोठ्याने वाचन करत बसायचा. शाळेतील शिक्षकांनी दिलेला अभ्यास तो त्या चिमणीपुढे बसून पूर्ण करत असे. इ.१ ली ते इ.७ वीपर्यंत त्याने कधी पहिला नंबर सोडला नाही.
याच कालावधीत आमच्या गावामध्ये थोडा बदल झाला. शहरातील लाईट आता आमच्या गावात आणि शेतात आली होती. विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार बसविल्या. काही कालावधी नंतर पाईपलाईन केली, विहीरींचे खोदकाम केले. ही सर्व कष्टाची कामे घरच्याघरी व पायरा करून केली. विहिरींचे खोदकाम करीत असताना विहिरीतून खरीपाने भरलेली पाटी डोक्यावर घेऊन ती वरती आणायची (खरीप म्हणजे विहीरचे खोदकाम करताना निघणारा काळ्या रंगाचा दगड व मुरूम) आणि ते खरीप एका बाजूला टाकायचे. अशी अवजड कामे उन्हाळ्याच्या दिवसात चालायची. ही सर्व कामे झाल्यानंतर काहीसे चांगले दिवस संसारत येऊ लागले. माझा दुसरा मुलगा इ.७ वी नंतर पाटीलवस्ती येथील शाळेत जाऊ लागला. शाळा बदलल्यामुळे आणि शाळेत पायी चालत ४ कि.मी.चा प्रवास केल्यामुळे तो दमल्यासारखा होत असे. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रुटीन चालू असे. दमल्यामुळे त्याचा अभ्यास होत नसे. एेकेिदवशी शाळेतून घरी आल्यावर त्याला काय झाले कोणास ठाऊक? तो रागातच होता, आणि घरी आल्या आल्या माझ्याशी रागातच बोलला, मला उद्याच्या उद्या सायकल पाहिजे नाही तर मी शाळेतच जाणार नाही. त्याचे हे बोलणे एकून माझ्या मनाला जरा हळहळ वाटली. उद्या जर पोरानी शाळा सोडून दिली तर त्याचे खूप मोठे नुकसान होईल. काहीतरी करून जुनी का होईना सायकल घ्यायला पाहिजे. मग मी नवऱ्यापाशी सायकलचे नाव काढले. त्यांना म्हणाले, आहो… पोरगं म्हणतयं मला सायकल पाहिजे नाही तर मी शाळेत जाणार नाही. तो असाच अडून बसला आहे. हे सांगितल्यावर नवऱ्याने मला आणि मुलाला बडबड केली. पण, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावातील सायकल दुकादाराकडे जाऊन एक जुनी सायकल घेऊन आले. ती सायकल बघून मुलगा खूष झाला व आनंदाने सायकलवर शाळेत जाऊ लागला. इ. ८ वी, ९ वी. १० वी मध्ये त्याचा काही नंबर आला नाही पण नापास नाही झाला. इ.१० मध्ये तर तो काटावर पास झाला व त्याचा कॉलेज जीवनाचा प्रवास सुरु झाला. त्याने इ. ११ वी व १२ वी केली. नंतर मात्र आमच्याकडे शाळेसाठी पैसे कमी पडू लागले. कारण तिन्ही मुलांना शाळा शिकवायची म्हटले तर आमची दमछाक व्हायची. त्यानंतर त्याला मी म्हटले, बापू.. आता कुठेतरी कामला जा.. आणि शाळेला तुझा तूच खर्च कर.. मग त्याने त्याच्या चुलत्याकडे कामासाठी नाव काढले. त्याच्या चुलत्याचा एका पाहुणा अकलूजमध्ये हमालकीची कामे करत असे. त्याच पाहुण्याबरोबर ताेही सिमेंटी पोती ट्रकमधून उतरविणे, युरियाची पोती ट्रकमधून उतरविणे, पाईप ट्रकमधून उतरविणे अशी हमालीची कामे करू लागला. तेथून पुढील शिक्षण त्याचे त्यानेच पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण करून (बी.ए., जी.डी.सी. ॲन्ड. ए.) आज तो ‘सकाळ मिडिया प्रा. लि.’ या न्यूज पेपरमध्ये जाहिरात डिझाईनर म्हणून कार्यरत आहे.
तिसऱ्या मुलाचा स्वभाव मात्र शांत असायचा. त्याला शाळेविषयी जास्त काही सांगवे लागले नाही. कारण या दोन्ही भावांच्या नादाने तो पण शाळेत जाऊ लागला. इ. १ ली पासून त्याचे दोन मोठे भाऊ काळजी घेत असे. इ. १ ली ते ७ वी वर्गामध्ये नेहमी तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर असायचा. इ. ७ वी पर्यंत गावामध्ये शाळा असल्यामुळे जास्त काही येण्या-जाण्याचा त्रास मुलांना झाला नाही. इ.८ वी ते १० वी. तिन्ही मुले ४ कि.मी. कधी सायकलवर तर कधी चालत शाळेला जात असे. इ. १० वी झाल्यानंतर त्याला पण मी सांगितले की, आता तुझ्या शाळेचा खर्च तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे तरी कामाला जाऊन कर.. तो पण अकलूजमधील एका किरणा मालाच्या दुकानात कामाला जाऊ लागला. उन्हाळ्याची सुट्टी संपली की, कमाविलेल्या पैशाचा उपयोग तो शाळेसाठी करीत असे. असे करत करत तोही कॉलेजला जाऊ लागला. पण तो कधी नापास झाला नाही. तो त्याच्या मनानेच आपले करिअर निवडत असे आणि जिद्दीनेच तो पूर्ण करीत असे. कॉलेज जीवनात असताना त्याला खाकी वर्दीची जास्त आवड निर्माण झाली. का कोणास ठाऊक? पण त्याला पोलीस भरतीची आवड निर्माण झाली. तो कॉलेजमध्ये असतानाच एन.सी.सी. मध्ये भाग घेत असे, व्यायाम करीत असे. सरांनी सांगितलेले ऐकत असे. ऐकेदिवशी एन.सी.सी.च्या सरांनी तो परेड करत असताना पाहिले आणि त्याची परेड सरांना आवडली. त्याला बोलावून घेतले आणि सांगितले की, तुझी निवड पुणे येथील कॅम्पसाठी करीत आहोत तर तु कॉम्पला जाशील का? असे विचारल्यावर तो हो म्हणाला.. आणि निवड झाल्यानंतर त्याला खूप अानंद झाला. आता आपले स्वप्न पूर्ण होणार असे त्याला वाटू लागले. संध्याकाळी कॉलेजवरून घरी आल्यावर मला त्याने सांगितले की, माझी निवड एन.सी.सी. कॅम्पसाठी झाली आहे आणि मला सरांनी पुण्याला जाण्यास सांगितले आहे. त्यावेळेस मलापण खूप आनंद झाला. तो काहीतरी करून दाखविल असे वाटू लागले. मी पण त्याला पुण्याला जाण्यास होकार दिला आणि तो आनंदाने पुणे येथील कॅम्पला गेला. कॅम्पचा होणारा खर्च कॉलेजनेच केला होता. परंतु, काही झाले कोणास ठाऊक? पण… तो परेड करत असताना तो अचानक पोटावरती पडला. आणि पोटातील आतड्याला जखम झाली. कॅम्प पूर्ण झाल्यावर तो गावी आला असताना त्याच्या पोटात दुखायचे काही केल्या राहातच नव्हते. मग थोरल्या मुलाने त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला असताना डॉक्टरांनी सांगितले की, त्याला चार दिवस ॲडमिट करावे लागेल कारण, त्याच्या आतड्याला सूज आलेली आहे. मग थोरल्या मुलाने घरी न सांगताच त्याला ॲडमिट केले आणि हॉस्पिटलचा खर्चही त्यानेच केला. डिस्चार्ज घेताना डॉक्टरांनी त्याला सांगितले की, पोटावर ताण येईल असे व्यायाम करू नका. ठिक आहे, म्हणून ते दोघेही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आले. घरी आल्यावर त्याने आठ दिवस आराम केला. नंतर काय त्याच्या मनात आले कोणास ठाऊक त्याने एन.सी.सी.चा विचार सोडून दिला व इंजिनिअरींग क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि इंजिनिअरींगमधील डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरींग पूर्ण केले. (बी.ए., डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर) इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्याच्यानिमित्ताने तो पुणे येथे आला असताना त्याला एका कंन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तो नोकरी करत असताना जास्त पगार मिळत नसे म्हणून त्याने ती नोकरी सोडली आणि आज तो पुण्यामध्ये एक छोटीशी कंन्स्ट्रक्शन फर्म चालवित आहे.
तिन्ही मुलांची दहा ते पंधरा वर्षापूर्वीच लग्नेही झाली, सूनाही चांगल्या शिक्षण झालेल्या मिळाल्या आहेत. मुलांचे संसारही चांगले चालू आहेत. त्याचे संसार बघता बघता आज मला चार नातू आणि एक नात आहे. संसारामध्ये कधी-कधी तू-मी होत असते परंतु, सर्व सूना-मुले समजून घेतात. काही असेल-नसेल तरी सूना ह्या समजून घेतात. मुलेही त्यांचा बायकांना समजून घेतात. हा प्रवास करीत असताना अनेक अडचणींवर मात केली. त्यातून मुलांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आजही धडपड सुरू आहे. हे सर्व करीत असताना आम्ही आमच्या कुलदैवताला कधीही विसरलो नाही. आम्ही वर्षातून एकदा कुलदैवताच्या दर्शनाला एकत्र जातो, आनंद घेतो. देवदर्शनाला जाताना किंवा फिरायला जाताना कोणाचा खर्च कमी-जास्त झाला तर तीनही मुले समजून घेतात, एकत्र राहतात. एकमेकांच्या अडीअडचणी सांगतात, अडचणींच्या वेळेला ते उभे राहतात, अडचणी आल्यास आम्ही सर्व मिळून सोडविण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना सहकार्य करतो.
इथपर्यंतचा प्रवास करीत असताना लग्नानंतरची ४५ वर्षे कधी निघून गेली हे कळले सुद्धा नाही. ह्या सर्व प्रवासामध्ये माझ्या आई-वडीलांनीही माझा संसार चांगला होण्यासाठी धडपड केली. ते दोघेही स्वर्गवास होऊन १० ते १२ वर्षे झाली. माझ्या तीन्ही भावांनी मला वेळोवेळी मदत केली. गेल्यावर्षी दोन्ही भावांचे निधन झाले. परंतु, त्यांची आजही आठवण आल्याशिवाय राहत नाही. दोन्ही थोरल्या बहिणीही कधी मला विसरत नाहीत. सासू-सासरे माझ्या तीन्ही मुलांना मदत करीत होते. सासरे ६-७ वर्षापूर्वीच स्वर्गवास झाले. त्यांचीही आठवण येते. आज मी, माझा नवरा, तीन मुले, तीन सूना, पाच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुणे येथील सुसंगत फौंडेशनचे अध्यक्ष श्री. सुधाकर न्हाळदेसर आणि त्यांच्या सुसंगत परिवाराने मला लेख लिहिण्यासाठी मला प्रोत्साहन व संधी दिली, त्यातून काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते.
धन्यवाद…!
- सौ. लतिका दत्तू यादव
मु. पो. कोंडबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर - शब्दांकन ः श्री. सुरेश दत्तात्रय यादव
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.