सरकारला दाजीने लावला चुना, बायकोचे 30 फॉर्म भरले, 26 अर्जांचे पैसे बँकेत जमा…
सातारा (बारामती झटका)
लाडकी बहीण योजनेतील एक मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावावर ३० वेगवेगळे अर्ज दाखल करून हजारो रुपये मिळवले आहेत. खारघर येथील पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात आलेला आहे.
नवी मुंबईत, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये दिले आहेत. या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे. परंतु, एकाच महिलेच्या नावावर ३० अर्ज दाखल करून, विविध आधार कार्डांचा वापर करून आणि एकाच मोबाईल नंबरचा वापर करून रक्कम लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे.
साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावावर ३० अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला होता. यामध्ये सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत २६ अर्जांची रक्कम जमा झाली आहे. संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून २७ वेगवेगळ्या महिलांची माहिती तयार केली आहे.
या प्रकरणाची तक्रार पनवेल तहसिलदार कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. खारघर येथील पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाइल नंबरवरून दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी २८ ऑगस्ट रोजी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी मदतीची विनंती केली होती. नंतर २९ ऑगस्टला, लॉगिन करण्याचा प्रयत्न करतांना अर्ज मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
निलेश बाविस्कर यांनी अधिक चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने साताऱ्यातून अर्ज भरल्याचे सांगितले. त्यानंतर ओटीपी शेअर करण्यास सांगितल्यावर तो दिला. कांचन बिर्ला यांच्या मदतीने तपास करतांना ३० लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आली आहे, हे समोर आले. २७ लाभार्थ्यांचे नाव एकसारखे असले तरी आधार कार्ड नंबर वेगवेगळे आहेत. २६ अर्ज मंजूर झाले असून ४ अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत. यावर, महामुनी, बिर्ला आणि बाविस्कर यांनी पनवेल तहसिलदारांकडे तक्रार केली आहे. संबंधित व्यक्तीनं पासवर्ड बदलल्याचेही उघड झाले आहे.
याप्रकरणी तपास सुरू आहे, आणि या गैरप्रकाराच्या पाठीशी असलेल्या व्यक्तींविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.