सरपंच पदाचा गैरवापर करून घरातील दोन नातेवाईकांना ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी बोगस ठराव मंजूर करणाऱ्या तत्कालीन सरपंचावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी
श्रीपूर (बारामती झटका)
महाळुंग ग्रामपंचायतीच्या तत्कालीन माजी सरपंच असलेल्या महिला सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून घरातील दोन नातेवाईक यांना ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी बोगस ठराव करून आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या नियम, अटी व सर्व संकेत पायदळी तुडवले आहेत. तसेच, त्या सरपंच असताना महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये आपल्या घरातील दोन नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्यासाठी त्यांनी तत्कालीन त्यांचे पार्टीतील सदस्य गटनेते यांना संगनमत करून ठराव संमत करण्यास भाग पाडले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये पाच व्यक्तींना नोकरीत घेण्यासाठी किमान पंधरा दिवस अगोदर नोकर भरतीची जाहिरात तसेच ग्रामपंचायतींच्या कार्यालयात नोटिस बोर्डवर त्याबाबत कोणतीही माहिती सुचना दिलेली नाही. तत्कालीन सरपंच यांच्या कालावधीनंतर नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे त्यांनी नोकर भरतीची प्रक्रिया पुर्ण केल्याने त्यांचे नातेवाईक असलेल्या दोघांना नोकरीची आपसूकच संधी मिळाली. त्यामुळे यापुर्वी ग्रामपंचायतीमध्ये गेली वीस-पंचवीस वर्षे कंत्राटी पद्धतीने नोकरी केलेल्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळू शकली नाही. त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना घरी बसवले गेले, हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
याबाबत महाळुंग-श्रीपूर मधील अनेकांनी तत्कालीन ग्रामसेवक व वरिष्ठांकडे तक्रार केली, पण दखल घेतली नाही. याबाबत नुकतीच पुणे विभागीय आयुक्तांकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल केली असून तत्कालीन सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येऊन त्यांनी पाच वर्षांत घेतलेले शासनाचे मानधन वसुल करुन घेऊन त्यांनी पाच वर्षांत घेतलेले निर्णय, घेतलेले ठराव याची वरिष्ठ पातळीवरून खातेनिहाय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सरपंच पदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी शासनाकडे सादर केलेले विवरण पत्र यातील त्यांची मालमत्ता व आज अखेर त्यांची असलेली संपत्ती यांची चौकशी केल्यास त्यांची बेनामी मालमत्ता लक्षात येईल. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे निवेदन तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.