सरपंच पत्नीसह शिक्षक पती 35 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

हॉटेलच्या पोर्चमध्ये ठरला पन्नास हजारांचा व्यवहार….
सांगली (बारामती झटका)
सांगलीत सरपंच शीतल पाटील व त्यांच्या पतीला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने पकडले. यानंतर सरपंच अपात्रतेची व शिक्षक पतीच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी जिल्हा परिषदेने प्रक्रिया सुरू केली आहे. शीतल पाटील व त्यांचे शिक्षक पती बाळासाहेब यांना ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. पती-पत्नी दोघांवर शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने सरपंच शीतल यांच्या अपात्रतेसाठी कार्यवाही सुरू केली आहे, तर शिक्षक बाळासाहेब पाटील याच्या निलंबनाची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
शीतल पाटील यांना लाच स्वीकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांच्या अपात्रतेची कारवाई विभागीय आयुक्तांच्या पातळीवर होणार आहे.
त्यासाठीचा अहवाल जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या जातील. सुनावणीमध्ये त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्याचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल. त्यानंतर त्यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर होणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाकुर्डे खुर्दच्या सरपंच शीतल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल आमच्याकडे दिलेला आहे. पुढील कार्यवाही सुरू केली आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या अपात्रतेबाबतचा अहवाल पाठवून दिला जाईल. – शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



