सरपंच-उपसरपंचाविरोधात अविश्वास ठरावाला दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुंबई (बारामती झटका)
ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठरावाच्या मंजुरीसाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. सदस्यांचे दोनतृतीयांश बहुमत असेल तर अन्य तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली नसली तरीही अविश्वास ठराव आणून सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
कर्जत-नेरळ येथील मदापूर ग्रामपंचायतीतील सरपंच दामा निरगुडा आणि अन्य सात सदस्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी इतर सदस्यांची मते विचारात न घेणे, गावच्या विकासकामांमध्ये खोडा घालणे, महिला ग्रामपंचायत सदस्यांबाबत असभ्य भाषेत बोलणे तसेच इतर गैरवर्तनाबद्दल उपसरपंचाविरोधात तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर अविश्वास ठराव आणला.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी १९५९ च्या मुंबई ग्रामपंचायत बैठक नियमावलीतील १७ ते २६ मधील तरतुदींना धरून प्रक्रिया पार पाडली गेली नाही, असा निष्कर्ष काढला. त्याच आधारे उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सरपंच दामा निरगुडा व इतर सात सदस्यांच्या वतीने ॲड. प्रशांत राऊळ यांनी गैरकृत्ये करणाऱ्या उपसरपंचाला पदावरून हटवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेबर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर सुनावणी झाली.
यावेळी ॲड. कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध उपसरपंच चंद्रकांत शिनरेंनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिलेला निर्णय विचारात घेतला नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती जामदार यांनी दोनतृतीयांश बहुमताच्या जोरावर अविश्वास ठराव आणून उपसरपंचाला पदावरून हटवण्याचा निर्णय वैध ठरवत, याचिकाकर्त्या ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा दिला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I found this article both enjoyable and educational. The insights were compelling and well-articulated. Let’s dive deeper into this subject. Check out my profile for more discussions!