सात हजार रुपयांसाठी तोंडाला सुटले पाणी; ग्रामसेवकांसह तिघेजण गोत्यात

मोहोळ (बारामती झटका)
फुकटच्या ७ हजार रुपयांसाठी आधी तोंडाला सुटले पाणी आणि पुन्हा पडली घशाला कोरड !, असा प्रकार एका ग्रामसेवकासह तिघांना अनुभवायला मिळाला असून मोहोळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय सेवकांना पगारापेक्षा फुकटच्या पैशांचा मोह अधिक असल्याचे नेहमीच अनुभवायला येत असते. सरकार भलामोठा पगार देत असले तरी लाचेशिवाय यांची भूक भागत नाही, हे अनेकदा दिसते. वरिष्ठ दर्जाच्या अधिकारांपासून ते शिपायांपर्यंत अनेक लाचखोर तुरुंगात जाऊन बसले आहेत. तरी देखील लाचखोर शुद्धीवर येत नाहीत. उलट लाचखोरीचा प्रकार अलीकडे थेट गावपातळीवर पोहोचला आहे. सरपंच, ग्रामसेवक देखील लाच मागतात आणि ते घेतात, असे काही प्रकार उघडकीस देखील आलेले आहेत. काही ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात पकडले असतानाच आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवक आणि अन्य दोघांच्या विरोधात ७ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषकुमार नवनाथ वाघ (वय ३७, ग्रामसेवक, चिंचोली काटी ग्रामपंचायत, रा. गवत्या मारुती चौक, मोहोळ), परशुराम रवींद्र पाटोळे (वय ३५, सेवक, कंत्राटी, रा. चिंचोली काटी), सुधीर लांडगे (वय ४८, खाजगी इसम, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

घर बांधकामास कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेला गावठाण परवाना मिळवण्यासाठी ग्रामसेवकाच्या वतीने ७ हजार रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम कंत्राटी सेवकामार्फत स्वीकारल्याप्रकरणी चिंचोली काटीचे ग्रामसेवक अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून सापळा लावून सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदारांनी घर बांधण्यासाठी खाजगी फायनान्सकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता. कर्ज मंजुरीसाठी ग्रामपंचायत येथील गावठाण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामसेवकाची भेट घेतली. हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. ही लाच देणे मान्य नसल्यामुळे सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली.
या तक्रारीची सदर विभागाकडून पडताळणी करण्यात आली. यात लाचेची मागणी केली असल्याचे दिसून आले. ग्रामसेवकाकडून तक्रारदाराला सेवकाला भेटण्यास सांगण्यात आले. त्यानेही ग्रामसेवकामार्फत ७ हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या पद्धतीने सापळा लावला आणि खाजगी व्यक्तीच्या मार्फत लाचेची ७ हजाराची रक्कम स्वीकारताना रंगेहात कारवाई करण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक संतोषकुमार वाघ यांच्यासह कंत्राटी सेवक परशुराम पाटोळे, खाजगी व्यक्ती सुधीर लांडगे या तिघांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.