सावित्रीमाईंच्या विचारांचे जाज्वल्य आजही प्रज्वलित : सुरेखाताई निकाळजे.

बुलढाणा येथे ‘सावित्रीमाई काल,आज आणि उद्या’ चर्चासत्र संपन्न:
बुलढाणा (बारामती झटका)
स्त्रियांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढून अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करणाऱ्या सावित्रीमाई फुलेंमूळेच स्त्रियांमध्ये आत्मनिर्भर, स्वाभिमानी विचारांचे जाज्वल्य प्रज्वलित झाले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी उभारलेला लढा आजही स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. तोच स्त्रियांच्या उद्धाराचा लढा महिला चळवळीच्या माध्यमातून आम्ही गतिमान करण्याचा प्रयास करू हेच सावित्रीमाईंना खरे अभिवादन ठरेल, असे मत रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे यांनी व्यक्त केले. रमाई ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिनी संघटना, जिजाऊ ब्रिगेड, किसान ब्रिगेड, वारकरी धर्म परिषद, आझाद हिंद महिला संघटना, महिला अत्याचार निवारण संघटना आदी महिला अधिकारासाठी लढणाऱ्या चळवळींच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीमाईंच्या जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा शहरातील आझाद हिंदच्या मुख्यालयामध्ये सावित्रीमाई काल आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्राचे आयोजन तीन जानेवारीला दुपारी करण्यात आले होते. यावेळी प्रथम सत्रातील चर्चासत्राच्या अध्यक्ष म्हणून सौ. निकाळजेंनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई सुशीर, शहराध्यक्ष आशाताई गायकवाड, शाहीर परिषदेच्या शहराध्यक्षा छाया पाटील, ज्येष्ठ विचारवंत सुभाष भागीले, भगवान खरडे सर, शिवव्याख्याते ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, आझाद हिंदचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे, रामेश्वर मुळे, समर्थ तायडे, कडूबा हिवरकर आदींनी चर्चासत्रात सहभाग घेत प्रमुख उपस्थिती दर्शविली.
सावित्रीमाईंना माल्यार्पण आणि पुष्पअर्पण करून सामूहिक अभिवादनाने चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन उर्मिला रोठे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पंचफुलाबाई गवई यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी आयोजक संघटनाच्या सर्व प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
चर्चा सत्रातील सुर…
जागतिक स्तरावर महिलांचा सन्मान करणारा देश म्हणून भारताची ओळख.
राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा स्रीमुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळेच माता रमाई, भिमाई आणि सावित्रीमाईंचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य महिलांना मिळाले.
सावित्रीमाईंच्या क्रांतिकारी कार्य आणि विचारांमुळेच आजची महिला आत्मनिर्भर आणि सुशिक्षित झाली. तत्कालीन परिस्थितीत महिलांना चूल आणि मूल सोडून शिक्षणाची द्वारे उघडणाऱ्या सावित्रीमाईंचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे राहील. फुले दांपत्याच्या त्याग समर्पणामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण दिले. त्यामुळेच देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान यासह सर्वोच्च पदांवर महिलांना आरक्षित जागा मिळाल्या. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे अधिराज्य आहे. त्यामुळेच आज भारत देश जागतिक स्तरावर महिलांचा सन्मान करणारा देश म्हणून ओळखला जातो. हीच खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंच्या कार्याची पावती आहे. असा एकंदरीत सूर चर्चासत्रात सहभागी वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून समोर आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



