शालेय जीवनात अभिनयाला मिळालेल्या व्यासपीठामुळे मुले विविध क्षेत्रात उज्वल भवितव्य घडवत आहेत – जयसिंह मोहिते पाटील

चित्रपट अभिनेता योगेश खिलारे राज्य शासनाच्या कै. काशिनाथ घाणेकर पुरस्काराने सन्मानित.
संग्रामनगर (बारामती झटका) (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज (ता. माळशिरस) येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला योगेश दादू खिलारे. शालेय शिक्षण घेत असताना त्याला कला सादर करण्याची विविध व्यासपीठावर संधी मिळाली. प्रताप क्रिडा मंडळाच्या माध्यमातून समुह नृत्य स्पर्धेत प्रा. सुभाष दळवी यांनी त्याला पहिली संधी दिली. पुढे अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित गौरव मराठी मातीचा व गौरव भारतीय लोककलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका गाण्यामध्ये भाजी विकणाऱ्या कलाकाराची भूमिका मिळाली होती. ही भूमिका त्याने अत्यंत प्रभावीपणे व जीव ओतून पार पाडली व त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. पुढे तो मिळालेल्या संधीच सोनं करत गेला.

या कार्यक्रमास उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी त्याचा अभिनय पाहून कौतुक केले व पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढे संस्थेच्या अनेक लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून त्याला वारंवार कला सादर करण्याची संधी मिळत गेली. त्यातूनच त्याला प्रेरणा मिळाली. पुढे त्याने कला क्षेत्रात अभिनय व मेहनतीच्या जोरावर नाव कमावले. आज त्याच्या पहिल्याच मराठी चित्रपटातील पदार्पणात उत्कृष्ट सिनेअभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ५९ वा महाराष्ट्र राज्याचा अत्यंत प्रतिष्ठेचा कै. काशिनाथ घाणेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल योगेश खिलारे याच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आजपर्यंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सैराट या चित्रपटात आर्चीची भूमिका साकार करणारी रिंकू राजगुरू, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बहिर्जी नाईकाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे करून चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केलेले चित्रपट कलावंत अजय तपकिरे व सोमनाथ (कांबळे) वैष्णव, चित्रपट, दूरदर्शन व नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले व सध्या मध्यप्रदेश मधील सेंट्रल यूनिवर्सिटी, सागर येथे नाट्यशास्त्र विभागात सेवेत असलेले प्राध्यापक डॉ. अल्ताफ मुलाणी तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड व डॉ. अपर्णा कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा. धीरज गुरव तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चित्रपट क्षेत्रात नावारूपाला आलेला चित्रपट दिग्दर्शक सहदेव घोलप, दिग्दर्शक क्षेत्रात योगीराज भिसे हे नाट्य, दूरदर्शन व चित्रपट दिग्दर्शक म्हणून आज नावारूपाला आले कलाकार आहेत. या व्यतिरिक्त संस्थेचे अनेक विद्यार्थी दूरदर्शन, चित्रपट व नाट्य क्षेत्रात आज कार्यरत आहेत. या सर्वांच्या यशाच्या पाठीशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची दूरदृष्टी, प्रोत्साहन व मार्गदर्शन आहे.
हा राज्यस्तरीय मराठी चित्रपट पुरस्कार योगेश खिलारे याला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गौरव मराठी मातीचा, गौरव भारतीय लोककलेचा व शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नृत्य दिग्दर्शन करत करत आज राज्य शासनाचा कै. काशिनाथ घाणेकर उत्कृष्ट अभिनेता पुरस्करापर्यंत पोहचलो आहे. – योगेश खिलारे (अभिनेता) कै. काशिनाथ घाणेकर पुरस्कार
आपली मातृभाषा मराठी जिवंत रहावी यासाठी इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटाची निर्मिती केलेली असून एखाद्या चित्रपटाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त पैशाची आवश्यकता लागत नाही तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, कष्ट, जिद्द असावी लागते. त्याचेच जिवंत उदाहरण म्हणजे ‘इंटरनॅशनल फालमफोक’ होय. हा चित्रपट सत्यात उतरताना कलाप्रेमी व दूरदृष्टी असणारे जयसिंह मोहिते पाटील यांचे सदैव मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. प्रा. धीरज गुरव चित्रपट दिग्दर्शक,अकलूज.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.