शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी ५५ हजार रूपयांची लाच घेताना पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील दोघे जाळ्यात
पंढरपूर (बारामती झटका)
प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज संध्याकाळी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
यातील तक्रारदाराच्या शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल होती. यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ५५ हजार स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख ५५ हजार रुपये स्विकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले.
आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. १३ ते १७ जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते. आज अखेर सायंकाळी सहा वाजणेच्या दरम्यान स्वतःच्या कार्यालयात लाच स्विकारताना सापडले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सिने स्टाईल झाली कारवाई…..
तक्रारदाराला लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयातच आरोपींनी बोलवले होते. यातील आरोपी शिपाई नितीन मेटकरी यांने कार्यालयामध्येच ५५ हजार रुपये मोजून घेतले. रक्कम मोजून झाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला. आरोपी पळून जाऊ नये म्हणून कार्यालयातील सर्व गेट बंद करण्यात आले होते. आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी थेट आपल्या कार्यालयाचाच वापर केल्याने एकच खळबळ माजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.