अमेरिकेत बबनदादा शिंदे यांची हृदय ट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी, रणजितसिंह शिंदे यांची माहिती

बेंबळे (बारामती झटका)
माढा तालुक्याचे परमदैवत माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे वरील अमेरिकेत हार्ट ट्रान्सप्लांटेशन (हृदय परिवर्तन) शस्त्रक्रिया संपूर्णपणे यशस्वी झाली असून ईश्वर कृपेने काळजी करण्यासारखे कारण नसल्याची माहिती दादांचे चिरंजीव व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह बबनराव शिंदे यांनी अमेरिकेतून दूरध्वनीवरून दिली आहे. ही शस्त्रक्रिया अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी यशस्वी केली आहे. या वृत्तामुळे सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त होत असून हजारो, लाखो नागरिक डॉक्टर मंडळींना धन्यवाद देऊन ईश्वराचे आभार मानत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, मागील वीस वर्षापासून बबनदादा शिंदे यांना हृदयविकाराचा त्रास होत होता, व सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे वर नियमित उपचार चालू होते, त्यांच्याच सल्ल्यानुसार बबनदादांना (हृदय बदलण्यासाठी) हार्ट ट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रियेसाठी १३ जून २०२५ रोजी अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी.जे.सी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यांचे बरोबर रणजीत सिंह शिंदे, दादासाहेब तरंगे आणि दादांचे स्वीय सचिव बापू शिंदे आहेत. सेंट लूईस येथील बी. जे. सी. हॉस्पिटलमध्ये अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी बबनदादांच्या हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. डॉक्टर अमित पावले हे टेंभुर्णी येथील सुप्रसिद्ध डॉ. ए. एस. पावले व सौ. हेमलता पावले यांचे चिरंजीव आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवार दि. १८ ऑगस्ट च्या रात्री १० ते १९ ऑगस्ट च्या पाहटे ४ वाजेपर्यंत ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे डॉक्टर अमित पावले यांनी रणजीतसिंह शिंदे यांना त्या ठिकाणी सांगितले.
आदरणीय बबनदादांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून हजारो, लाखो नागरिकांनी ईश्वराला महायज्ञ, अभिषेक व प्रार्थना केल्या होत्या, त्या मनोकामना आणि शुभेच्छा ईश्वराने सफल केल्या हे स्पष्ट दिसून येत आहे व ही आनंदाची बाब आहे. दोन ते तीन महिन्यानंतर आदरणीय बबनदादा पुन्हा घरी येऊन समाजसेवा आणि लोकसेवेमध्ये सहभागी होणार हे निश्चित व त्यामुळे लाखो नागरिकांमधून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



