शेतकऱ्याच्या कन्येचा अभिमानास्पद यशस्वी प्रवास, एकाच वेळी दोन शासकीय नोकऱ्या मिळवण्याचा विक्रम

कारखेल (बारामती झटका)
मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कारखेल गावातील सुरेश गायकवाड या शेतकऱ्याच्या कन्येने एकाच वेळी दोन शासकीय नोकऱ्या मिळवण्याचा विक्रम करून अभिमानास्पद यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
निशा सिंधू सुरेश गायकवाड हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत, कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या सातत्याच्या जोरावर सरकारी परीक्षांमध्ये यश मिळवले. एमपीएससीमधून निशाची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंत्रालय महसूल सहाय्यक (Revenue Assistant) अधिकारी या दोन्ही शासकीय पदांसाठी यशस्वी उमेदवार म्हणून निवड मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल संजय मगर मनसे तालुका अध्यक्ष यांनी अभिनंदन केले व शुभेच्या दिल्या.
निशाचे वडील सुरेश गायकवाड शेतकरी असून, आई सिंधू गायकवाड गृहिणी आहेत. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही पालकांनी निशाच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. तिला एक भाऊ अक्षय गायकवाड, जो सध्या M.Sc. (Computer Science) चे शिक्षण घेत आहे, आणि एक बहिण नम्रता गायकवाड शिंदे, जी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. संपूर्ण कुटुंबाने निशाला यशासाठी मोठे पाठबळ दिले.

निशाने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोखंडेवस्ती येथे पूर्ण केले. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होत तिने लहान वयातच तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. तिने माध्यमिक शिक्षण विर संताजी घोरपडे विद्यालय, कारखेल येथे घेतले आणि दहावीला प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर तिने सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड मधून बारावी शिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. पुढे तिने यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स मधून B.Sc. (Chemistry) ही पदवी प्राप्त केली.
शिक्षण घेत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर ती यशस्वी झाली. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक आणि संपूर्ण गावातील नागरिक अभिमान व्यक्त करत आहेत. तिच्या प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली, “शेतकऱ्यांची मुलंही मोठी स्वप्ने पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात. सातत्य आणि आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे.”

तिच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे. समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही तिच्या जिद्दीचा आदर्श घ्यावा, असे मत स्थानिक लोक व्यक्त करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.