शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी भाटघर धरण १००% भरले…

फलटण (बारामती झटका)
शेतकऱ्यांसाठी महत्वाची व दिलासादायक बातमी; नीरा खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणारे भाटघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरलेले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून नदी पात्रामध्ये आज सकाळी ६ वाजता १६६५ क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली असून हे पाणी वीर धरणात येणार असल्याने वीरच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो, अशी माहिती सहाय्यक अभियंता, योगेश भंडलकर यांनी दिली.
नीरा खोऱ्यात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली असून बुधवार २० सप्टेंबर सकाळी ६ ते आज गुरुवार २१ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासात नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात शिरगांव येथे ६२ मिमी, शिरवली ५० मिमी, हिरदोशी ४३ मिमी, गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात घिसर येथे ४४ मिमी तर भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात घिसर येथे २९ मिमी तसेच नीरा देवघर धरणावर १६ तर गुंजवणी धरणावर १८ मिमी पावसाची नोंद झाली. कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावासाने नीरा खोऱ्यात मागील २४ तासात ०.६० टीएमसी पाणी जमा झाले.
सकाळच्या नीरा खोरे अहवालानुसार भाटघर धरण १००.००% भरले असून धरणात उपयुक्त पाणीसाठा २३.५० टीएमसी झाला, तसेच नीरा देवघर ९९.१४% उपयुक्त पाणीसाठा ११.६२ टीएमसी, गुंजवणी ९२.८२%, उपयुक्त पाणीसाठा ३.४२ टीएमसी तर वीर ४४.३३% उपयुक्त पाणीसाठा ४.१७ टीएमसी एवढा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng