ताज्या बातम्या

श्री दत्तजयंती माहिती अणि दत्त जन्माची कथा

बारामती झटका

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी श्रीदत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत व गावागावात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीचे महत्त्व
दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. यादिवशी दत्तात्रेयांच्या मुर्तीस तसेच दत्तस्वरुप असलेल्या औदुंबर वृक्षास अभिषेक केला जातो. तसेच एखादी दिर्घ मनोकामना पुर्ण होण्यासाठी ‘दत्तयाग’ केला जातो.
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेने अनेकांच्या मनोकामना पुर्ण झाल्याचे अनुभव दृष्टीस पडतात. ज्या घरात पितृपिडा अथवा बाधा आहे, त्या घरात नित्य दत्तउपासना केल्यास मुळापासून बाधेचा परिहार होतो.

श्री दत्त जन्मोत्सव साजरा करणे
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी तीन अथवा सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

श्री दत्त जन्माची कथा
अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची आणखी एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.
याशिवाय श्री गुरुचरित्राच्या चवथ्या अध्यायामध्येही श्रीदत्त जन्माची कथा आहे.

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण/ दिनचर्या
श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. अशा या लोकप्रिय दैवत असणार्‍या श्रीदत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button