Uncategorized

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक वर्ष एकाच जागी असलेल्या अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली.

माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या आशीर्वादाने अनेक शाखेमध्ये शाखाधिकारी, लिपिक, शिपाई यांची बदली नसल्याने निर्ढावलेले आहेत; वठणीवर आणण्यासाठी बदल्यांची गरज…

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दादाचा पीए आप्पा अनेक वर्ष कामावर हजर नसताना बँकेचा पगार घेऊन प्रस्थापित नेत्यांची चाकरी करीत होते. सोलापूर जिल्हा बँकेने अक्कलकोट दर्शन दिल्यानंतर माळशिरस तालुक्यातील अनेक दिवसांपासून दबलेला पिचलेला आवाज बाहेर येऊ लागलेला आहे. माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गावोगावी शाखा आहेत. माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या आशीर्वादाने अनेक शाखेमध्ये शाखाधिकारी, लिपिक, शिपाई यांच्या बदल्या नसल्याने निर्ढावलेले आहेत. त्यांना वटणीवर आणण्यासाठी बदल्यांची गरज आहे. सोलापूर जिल्हा बँकेत एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचारी शिपाई यांची मुजोरी वाढलेली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक खातेदारांना अरेरावीची भाषा बोलली जाते. शासनाचे पैसे खात्यावर जमा झाले तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत. आसपासच्या गावातून कोणाच्यातरी हातापाया पडून किंवा टमटमने आलेले खातेदार यांना हेलपाटे मारायला लावले जातात. अनेक ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी व शिपाई प्रस्थापित नेत्यांची हुजरेगिरी करण्याकरता राजकारण करून खातेदारांना वेठीस धरतात. आप्पाच्या अक्कलकोट दर्शनाने अनेकांच्या अपेक्षा प्रशासकांकडून वाढलेल्या आहेत.

सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील माळशिरस तालुक्यातील एकाच जागी अनेक वर्ष असलेल्या बँकेतील शाखाधिकारी, कर्मचारी, शिपाई यांच्या कोणत्या गावातील शाखेत किती वर्षापासून कार्यरत आहेत, याची इत्यंभूत माहिती मिळालेली आहे. अशा बेजबाबदार व गैरवर्तन करणाऱ्या शाखा अधिकारी, लिपिक, शिपाई यांच्या बदल्या करून सर्वसामान्य व गोरगरीब सभासदांना न्याय द्यावा, अशी ग्रामीण भागातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व सोसायटीचे सभासद यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button