सोलापूर विद्यापीठ प्राचार्य फोरमच्या उपाध्यक्षपदी प्राचार्य महेंद्र कदम यांची निवड

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर विद्यापीठ प्राचार्य फोरमची बैठक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठ प्राचार्य फोरमचे तसेच महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख होते.
सदर बैठकीत महाविद्यालय व प्राचार्यांच्या विद्यापीठ तसेच सहसंचालक व सीनियर ऑडिटर स्तरावरील अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा झाली. चालू आर्थिक वर्षात जी.एस.टी. संबंधी आलेल्या अडचणीबाबत चर्चा करून त्यासाठी विद्यापीठ व शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरले. विविध महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि फिजिकल डायरेक्टर व ग्रंथपालाची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासनाकडे संघटनेने पाठपुरावा करावा असे सर्वानुमते ठरले.
या बैठकीत सोलापूर विद्यापीठ फोरमच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी टेंभुर्णी येथील प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांची तर सहसचिवपदी प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे (जेऊर) आणि प्राचार्य डॉ. संतोष कोटी (सोलापूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीची सूचना संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे यांनी मांडली. त्यास फोरमचे खजिनदार प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीस प्राचार्य एस. के. जमादार, उपाध्यक्ष प्राचार्य एस. के. पवार, प्राचार्य डॉ. सी. बी. कोळेकर, प्राचार्य दलाल, प्राचार्य शोभा पांढरे यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतेक प्राचार्य उपस्थित होते. याच बैठकीत प्राचार्य शशिकांत तांबे यांची फोरमच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.