सोलापूर विमानतळाचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी संपन्न होणार..
पुणे (बारामती झटका)
सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेली ‘बिकास’ (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी) व ‘डीजीसीए’ची मंजुरी मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (ता. २६) सोलापूर विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्यासाठी तीन विमान कंपन्या इच्छुक आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात कोणती कंपनी सोलापूर विमानसेवा देईल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. विमान प्रवासासाठी सोलापूरकरांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रवासी सुविधा पुरविल्यानंतर ‘विकास’ व ‘डीजीसीए’ने अखेर विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर आता विमानतळ विमानसेवेच्या ‘टेकऑफ’ साठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता अधिक आहे. किमान एका महिन्याच्या आतच प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्याची आशा आहे.
तीन कंपन्या इच्छुक
सोलापूरहून विमान सेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या इच्छुक आहेत. यात फ्लाय ९१, स्टार एअर व अन्य एका कंपनीचा समावेश आहे. सोलापूर विमानतळाची धावपट्टी लहान असल्याने या विमानतळावर केवळ ‘एटीआर ७२’ या दर्जाचे विमान उतरू शकते. असे विमान छोट्या विमान कंपन्यांच्या ताफ्यात आहेत. इंडिगो व स्पाईसजेट सारख्या कंपन्या सोलापूर हून विमानसेवा सेवा सुरू करू शकणार नाहीत.
आज दिल्लीत बैठक
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता. १९) दिल्लीत सोलापूर विमानतळ संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व जिल्हाधिकारी डॉ. कुमार आशीर्वाद यांची उपस्थिती असणार आहे. मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोलापूर विमानतळाच्या प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूर विमानतळासाठी आवश्यक मंजुरी मिळालेली आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यावर लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच विमान कंपनी ठरवली जाईल. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.