एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार…

कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर
मुंबई (बारामती झटका)
एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित ४४ टक्के रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला आहे.
एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार मिळाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्वरित पगार तात्काळ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता. अपुऱ्या निधीमुळे केवळ ५६ टक्के पगार दिल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता या निम्म्या पगारात घर कसे चालवणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला होता. महामंडळाने शासनाकडे १ हजार ७५ कोटींच्या प्रतिपूर्ती रकमेचा प्रस्ताव पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला ४०० कोटींपेक्षा जास्त आणि हातात मिळणाऱ्या वेतनासाठी २५० कोटींपेक्षा अधिक रकमेची गरज असते. शासनाकडून गेल्या महिन्याची प्रतिपूर्ती रक्कम २७२ कोटी ९६ लाख रुपये मिळाले होते. त्यातील ४० कोटी एसटी बँकेला दिले, तर काही रक्कम पीएफसाठी दिल्याने महामंडळाकडे मार्चच्या पगारासाठी १३५ कोटी उरले होते. शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने पगारासाठी पैसे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पगार दहा दिवसांत करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा
शासनाच्या वित्त विभागाकडून महामंडळाला पुरेसा निधी देण्यात येत नाही. याला सर्वस्वी शासनाचे अर्थखाते जबाबदार आहे. येत्या १० दिवसांत पगारासाठी पैसे न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला होता.
एसटी कर्मचारी ४० ते ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात अहोरात्र काम करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीही संपूर्ण वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे तातडीने हे शंभर टक्के वेतन न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला होता.
आधीच कमी पगार आहे. त्यामध्ये निम्मा पगार खात्यात जमा झाला. आमच्यापैकी काही जणांनी कर्ज काढून घर घेतल्याने त्याचा २० ते २२ हजारांचा हप्ता भरल्यावर आम्ही खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. – अरविंद निकम, एसटी चालक, मुंबई सेंट्रल आगार
एकूणच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक मेहनत एसटी कर्मचारी करतात. तरीही आम्हाला निम्मा पगार मिळाला. आम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताही मिळत नाही. त्यात पगार कापल्याने कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च अशा अनेक समस्या निर्माण होणार आहेत. – दीपक जगदाळे, एसटी वाहक, लातूर
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.