ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी बैलगाडीतून आणले झेडपी शाळेत विद्यार्थी

सोलापूर (बारामती झटका)

अलीकडच्या काळात स्वयंचलित वाहनाच्या उद्योगातील प्रगतीमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिमतीला दुचाकीपासून स्कूलबस, कार, जीप अशा चारचाकी वाहनांचा आधार मिळत आहे. त्याचबरोबर शाळा जवळचे विद्यार्थी सायकलीचाही आधार घेताना दिसून येतात. पण बैलगाडीतून शाळेत विद्यार्थी आले तर…

शेतकरी व शेतीविषयी सर्वांनाच कुतूहल असते. बैलगाडीविषयी प्रत्येक लहान मुलांना आकर्षण असते. खेड्यामध्ये लहान मुलांना हे वाहन सहज उपलब्ध होते. बैलगाडीत बसण्याचा आनंदच काही निराळा आहे आणि अशा बैलगाडीतून जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी आले तर…

होय, हे खरे आहे. पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी बैलगाडीतून आले आणि विशेष म्हणजे या बैलगाडीचे सारथ्य जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.

आधुनिक शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शाळांना मॉडेल बनवण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.

सोमवार दि. 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. शाळा प्रवेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला भेट दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सरपंच डॉ. अमृता रणदिवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन वनसाळे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत. प्रत्येक मुलाने शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे पालक शिक्षणापासून वंचित आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे मुले शाळेत पाठवले जात नाहीत अशा पालकांनी आपल्या मुलाला शाळेत पाठविण्यासाठी हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. शाळा चांगल्या असाव्यात म्हणून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम शासन करीत आहे. तसेच अनेक शाळेमध्ये डिजिटल शिक्षण देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनामार्फत मुलांना गणवेश, शूज, पाठ्यपुस्तके देण्यात येत आहे. मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देत आहेत. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्याचे काम ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे केले सारथ्य…
कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावली. तरीही सर्वांचा उत्साह कायम होता. तुंगत शाळेतील प्रवेशोत्सवानिमित्त नवोगतांचे स्वागत करण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे सारथ्य केलं. तसेच पालकमंत्री यांचे भाषण सुरु असतानाच पावसाला सुरुवात झाली. यावेळी पाऊसामुळे काही विद्यार्थ्यांची चुळबुळ सुरू असताना पालकमंत्री गोरे यांनी मुलानो शांत बसा … हाताची घडी… तोंडावर बोट म्हणातच विद्यार्थी एकदम शांत झाले व पडत्या पावसातही विद्यार्थ्यांनी भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तत्पुर्वी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे मंत्री गोरे यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom