राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत चौदा लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

बारामती (बारामती झटका)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने तालुक्यात १२ ऑगस्ट पासून ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसह वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी, दुचाकी वाहनांसह १४ लाख ९१ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या कारवाईत एकूण १० आरोपींना अटक करून सहा गुन्ह्यांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे पाहुणेवाडी व माळेगाव खु. आणि तुकाईमळा माळेगाव खु. येथे एक टाटा कंपनीची चारचाकी मालवाहू गाडी व फिॲट कंपनीची पुण्टो वाहन हातभट्टी दारू वाहतूक व व्रिकीकरिता देत असल्याची माहिती मिळाली. ढवळे मळा, पाहुणेवाडी, तुकाई मळा माळेगाव खु. याठिकाणी ११ सप्टेंबर रोजी या वाहनांची तपासणी केली असता, १ हजार ९१० लिटर अवैध हातभट्टी दारुसह एकूण ९ लाख ७० हजार रुपये किंमतीची दोन वाहने आणि ९ हजार ३०० रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल असा मिळून एकूण ११ लाख ७० हजार ३०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत काशिनाथ सुरेश चव्हाण, रा. वरळेगाव पो. बोरामणी, ता. सोलापूर, आकाश नामदेव पवार, रा. वडजी तांडा, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, सुग्रीव अंकुश भंडलकर, सीताराम अंकुश भंडलकर, रा. खांडज, नवनाथ सदाशिव गव्हाणे, रा. माळेगाव खु. ता. बारामती, सागर अशोक गव्हाणे व दत्तात्रय विजय गिरे रा. दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर असे एकूण सात आरोपींना अटक करून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, सागर साबळे, मनोज होलम, जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे यांनी भाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, अशी माहिती श्री. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



