तालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु – डॉ. मनोज खोमणे

आठवड्याभरात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण
बारामती (बारामती झटका)
पावसाळा ऋतूमधील वातावरणातील बदल आणि पारेषण काळ असल्याने किटकजन्य आजारांचा धोका वाढू नये, याकरिता तालुक्यासह बारामती, माळेगाव नगरपंचायत हद्दीत आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वेक्षण, धूरफवारणी करण्यासह माहिती पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
तालुक्यामध्ये १२० पथकामार्फत या आठवड्यात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये ७९ घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या, या भागात आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविली जात आहे, डेंगू सदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्या भागात कटेनर सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत त्वरीत धूरफवारणी करण्यात येत आहे तसेच घंटागाडी (कचरागाडी ) वर ध्वनीफीतद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येऊन त्वरीत प्रयोगशाळेतून तपासणी करिता पाठविण्यात येत आहे.
नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, साठविण्यात आलेले पाणीसाठे रिकामे करावेत. सात दिवसाच्या आत पाणीसाठे रिकामे करुन ते स्वच्छ कोरडे करून पुन्हा वापरात आणावेत. ताप आल्यास त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व शासकीय दवाखान्यात मोफत आजाराचे निदान, उपचार घ्यावेत, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



