ठेवला तर सडतोय अन, विकला तर रडवतोय – कुबेर जाधव

कसमादे तील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला.
देवळा (बारामती झटका)
अनेक संकटांनंतर कांदा निर्यात बंदी उठली परंतु, सततच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पत गेलेली कांदा निर्यात अद्यापही सुरळीत होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. कांदा काढण्याच्या वेळेस सततचा अवकाळी पाऊस, वातावरणातील आद्रता त्यामुळे चाळीत साठवलेला कांदा सडत चालला असून उत्पादन खर्च निघेनासा झाला असून कांद्याचे भाव वाढले तर नाहीत परंतु, गडगडलेले आहेत. अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे.
कांदा चाळीत ठेवला तर सडतोय व विकला तर रडवतोय “अशी कांदा उत्पादकांची केविलवाणी अवस्था झाली असून कसमादे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. इकडे आड व तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची बिकट व केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. कौटुंबिक खर्च, घरातील विवाह, समारंभाचा खर्च, मुलांची शैक्षणिक फी, दवाखान्याचा खर्च, आर्थिक अडचण असलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विकावा लागत आहे व विपरीत वातावरणामुळे चाळीतील साठवलेला कांदा प्रचंड प्रमाणात सडु लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. नाईलाजाने कांदा मातीमोल भावाने विकावा लागत आहे. कांदा ठेवला तर सडतोय व विकला तर रडवतोय, अशी केविलवाणी अवस्था कांदा उत्पादकांची झाली आहे. कांदा काढण्याच्या वेळेला सतत अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढलेला कांदा हा पावसामुळे शेतातच सडला व ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात ठेवला तो अवकाळी पावसाने भिजल्यामुळे तो साठवण्यायोग्य नसल्यामुळे तो कांदा मातीमोल भावाने विकावा लागला. उत्पादन खर्चावर आधारित भावही मिळत नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादकांना तातडीने भावांतर योजनेअंतर्गत किमान ५०० रूपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा.
दरम्यान, मोरेनगर, ता. बागलाण येथील कांदा रथाचे शिल्पकार व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादकांच्या व्यथेवर समर्पक असे व्यंगचित्र तयार केले आहे. महाराष्ट्राचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच कांदा धोरण निश्चित करण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या नाकर्तेपणावर व्यंगचित्रातून आसूड ओढले आहेत. साठवणूक केलेला कांदा खराब होत आहे. कांद्याचा प्रश्न गंभीर होत असताना कांदा धोरण समितीचे अध्यक्ष व तसेच राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष झोपा काढत आहेत का ?, असा संतप्त सवाल त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून विचारला आहे. अतोनात प्रमाणात कांदा चाळीत सडतोय अवकाळीने कांदा शेतातच सडला व सध्या कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भावहि मिळत नाही तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व राज्य सरकारच्या कांदा धोरण निश्चित करण्याऱ्या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांची जबाबदारी नाही का ?, दोन अडीच वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काय झाले, असा सवाल नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे. जर सद्याची समिती चांगले काम करत नसेल तर मग ही समितीचा फार्स कशासाठी ?, असा संतप्त सवाल किरण मोरे यांनी केला आहे. मातीमोल भावाने कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी कांदा समितीने काय शिफारस केली, असा प्रश्न किरण मोरे आणि कुबेर जाधव यांनी संयुक्त पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

या हंगामात लागवड जरी जास्त होती परंतु, बदलत्या हवामानाचा फटका कांदा उत्पादनाला बसला. करपा व तापमानात झालेली वाढ तसेच काढणीच्या वेळेस सततच्या अवकाळी पावसामुळे निघालेला बहुतेक कांदा भिजला व तो काही काढणे योग्य कांदा सततच्या अवकाळी पावसामुळे शेतातच सडला. व मे महिन्यापासून आजपर्यंत सततच्या आद्रतेमुळे कांदा चाळीत सढण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा उत्पादकांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागतो आहे. – कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



