उजनीचे पाणी पंढरपुरात दाखल…
पंढरपूर सह सांगोला, कासेगाव, पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी
पंढरपूर (बारामती झटका)
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले आहे. तब्बल पाच दिवसांनी रविवारी सकाळी पंढरपूर बंधाऱ्यात हे पाणी दाखल झाले. हा बंधारा भरून विष्णुपद बंधाऱ्यात पाणी आले. पंढरपूर बंधारा भरल्यामुळे पंढरपूर, सांगोला व कासेगाव पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मिटणार आहे.
चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झालाच नाही. उजनी धरण क्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे. परिणामी, उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात उशीर झाला आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरांची पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी रविवारी सकाळी पंढरपूर बंधाऱ्यात दाखल झाले. याच बंधाऱ्यावर पंढरपूर, सांगोला, कासेगाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. या योजना बंधाऱ्यात पाणी आल्यामुळे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे सांगोला शहराला तीन दिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा एक दिवसाआड सुरू राहणार आहे. तर पंढरपूरचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू होता तो आता एक दिवसाआड सुरू करण्यात येणार आहे.
असे असले तरी गेल्या चार दिवसांपासून गौरी-गणपती सणाला पाणी आले नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागले आहे. त्यामुळे या काळात नगरपालिकेने काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला आहे. मात्र, आता बंधारात पाणी आल्यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
उजनीतून सोडलेले पाणी बंधाऱ्यात आले. पाऊस पडला तर ठीक; अन्यथा हे पाणी पुढील तीन ते चार महिने पुरवायचे आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng