अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा तीन वर्षांनी भरणार

अंकोली (बारामती झटका दशरथ रणदिवे यांजकडून)

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा कोरोनाच्या संकटानंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजे या वर्षी शनिवार दि. २३ एप्रिलपासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे देवरुषी, महर्षी, तपस्वी, मुनिजन नित्य तपस्या करीत असताना आशा समयास काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, ध्यानधारणा करणारी एक गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.

एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे, असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.

संपुर्ण सोलापुर जिल्हा व परिसरातील सांगली, सातारा, कोल्हापूर, लातुर, उस्मानाबाद तसेच कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. २२ रोजी रात्री दहा वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, शनिवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. रविवार दि.२४ रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवेद्य गडशी, गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. सोमवार  दि. २५ रोजी रात्री दहा वाजता शोभेच्या दारूकामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री नऊ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे.

यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत पुजारी, अजित पुजारी व धनंजय पुजारी यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते गोरडवाडीचे बिनविरोध सरपंच विजय गोरड यांचा सन्मान.
Next articleवेळापूर सोसायटीचे चेअरमनसह नूतन संचालकांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने श्रीकांतदादा होडगे यांचेकडून सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here