अकलूज ( बारामती झटका)
अकलूज येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या गावठाण जागेच्या संदर्भात 722 लाभधारकांना प्लॉटचा ताबा मिळवून देणे कामी महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना.श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांची भेट घेऊन सोलापुर जिल्हा काँँग्रेसचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळाने निवेदन दिले यावेळी. ना. बाळासाहेब थोरात यांनी लवकरात लवकर सर्व लाभधारकांना प्लॉट वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अकलुज गावठाण मधील सर्व लाभधारकांना लवकरच प्लॉट ताब्यात दिले जातील, असे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
गेल्या अठरा वर्षांपासून अकलुजमधील सुमारे 722 लाभधारकांवर अन्याय केला जात होता. परंतु, कोणी उघडपणे काहीच बोलत नव्हते. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी या प्रकरणात भाग घेतल्यामुळे सर्व लाभधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व प्लॉट लाभार्थ्यांमध्ये प्लॉट मिळण्याची खात्री पटली आहे. जागेचा उतारा नावावर असुनही, ताबा पावती असुनही प्लॉट ताब्यात दिलेले नाहीत. या कारणामुळे अनेक लोकांना जागा नसल्याने घरकुलाची सुविधा मिळाली नाही. झोपडीमध्ये राहणारे अनेक गोरगरीब लाभधारकांना भर पावसाळ्यात घरात पाणी घुसल्याने पाण्यात रात्री काढाव्या लागत आहेत. याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली अनेक आक्रामक आंदोलने केली आहेत. परंतु प्रत्येक वेळी प्रशासन चालढकल करीत आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे वतीने यावेळी कसल्याही परिस्थितीत सर्व लाभधारकांना प्लॉट मिळवुन देणारच असा ठाम निश्चय केला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश संघटीका ज्योतीताई कुंभार, सोलापुर जिल्हा काँँग्रेसचे उपाध्यक्ष राजाभाऊ गुळवे, जिल्हा सरचिटणीस रणजीतसिंह देशमुख, अभिषेक कांबळे, जनसेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते, अभिषेक कोकाटे, रियाज मुलाणी, विराज खराडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng