गणेश नामदास यांच्या मृत्यूची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची नातेवाईक व मित्रपरिवारांची अपेक्षा
नातेपुते ( बारामती झटका)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समिती नातेपुते, ता. माळशिरस या कार्यालयातील खोलीमध्ये मंगळवार दि. 24 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याचे दरम्यान रोजंदारीवर काम करणारा गणेश अंगत नामदास वय 46 रा. एकशिव, ता. माळशिरस यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याने गणेश नामदास यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश नामदास यांच्या खिशामध्ये लिहून ठेवलेल्या चिठ्ठीप्रमाणे त्यांच्या मृत्यूची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करावा, अशी नातेवाईक व मित्रपरिवार यांची अपेक्षा आहे.
गणेश रामदास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 25 वर्षापासून रोजंदारीवर 185 रुपये पगारावर काम करीत आहे. गणेश यांची वारंवार पगारवाढ करून नोकरी कायम करावी, अशी इच्छा होती. त्यांनी वेळोवेळी संचालक मंडळ व सचिव यांच्याकडे मागणी केलेली होती. परंतु, प्रशासनाकडून डोळे झाक होत होती. गणेश यांना पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. महागाईच्या काळात कमी पैशात गृहप्रपंच चालवणे अवघड होत चाललेले होते. त्यामुळे घरात कटकटी होत होत्या. मित्रपरिवार यांना गणेश बोलून दाखवत असत.
प्रशासन पगारवाढ व कायम करीत नसल्याने आत्महत्या शिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे समजून गणेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहून ठेवलेली होती. सदरची चिट्ठी पोलीस प्रशासनाने उपस्थित नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यासमोर वाचून दाखवलेली आहे. त्यामध्ये सर्व माहिती लिहून ठेवलेली आहे. माझ्या मृत्यूस सर्वस्वी संचालक मंडळ व सचिव राजेंद्र काकडे जबाबदार आहेत. यामध्ये माझ्या परिवाराचा काहीही दोष नाही, असा मजकूर लिहिलेला आहे.
गणेश यांनी कार्यालयात गळफास घेतल्यानंतर पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. गणेश चांगल्या स्वभावाचे व मनमिळावू होते. सर्वांशी मिळून मिसळून गेली 25 वर्ष वागलेले होते. 25 वर्षात अनेक संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासनातील अधिकारी यांचा संबंध आलेला आहे. त्यामुळे गणेश यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणेश यांचा परिवार साधा व भोळा भाबडा आहे. दुःखाच्या मानसिक धक्क्यातून ते अजून सावरलेले नाहीत. परिवाराकडून गुन्हा नोंद होणे शक्य नाही, त्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी मृत्यूपूर्व जबाब चिट्टी समजून दोषींवर गुन्हा नोंद करावा. अकलूज उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी विशेष लक्ष घालून गणेश नामदास यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दोषी व्यक्तींवर गुन्हा नोंद करावा, अशी गणेश नामदास यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांची अपेक्षा आहे. यासाठी समाजातील सामाजिक चळवळीतील संघटनांनी व कार्यकर्त्यांनी आवाज उठवून सदर प्रकरणाला वाचा फोडावी, हीच खरी गणेश नामदास यांना भावपूर्ण आदरांजली होईल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng