अकलूज-पुणे अवैध प्रवासी वाहतूक जोमात, पोलीस आरटीओ मात्र कोमात…

अकलूज (बारामती झटका)

अकलूजमध्ये प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची जास्त दराने तिकीट आकारणी करून दररोज खुलेआम सुरू असलेली अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतुक कारवाई करून त्वरित बंद करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी अकलूजचे पोलीस निरीक्षक आरटीओ उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.

सदरची अवैध प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास १३ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूजसमोर हलगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊन काळात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस बंद झाल्यानंतर अकलूजमध्ये दररोज अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून दररोज विना परमिट तब्बल ५८ अवैध खाजगी वाहनांमधून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआम प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.

जास्त पैसे कमावण्याच्या हेतूने प्रमाणापेक्षा जास्त सीट कोंबून भरून राजरोसपणे प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस व आरटीओ नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अवैध खाजगी प्रवासी वाहतूक करणारे, मनमानी पद्धतीने एसटी बस पेक्षा जास्त तिकीट दर आकारून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत‌. यातील अनेक वाहनांनी आपले परमिट रिनीव्ह सुद्धा केलेले नाही तर, काही वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही. काही वाहन चालक दारू पिऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करीत आहेत‌. यामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला लागली आहे.

ज्यादा प्रवासी वाहतुकीमध्ये वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे‌‌. हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे एसटी बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरून आपापल्या दिशेने रवाना होतात. यामुळे एसटी प्रशासनाला चुना तर लागतोच, शिवाय नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो‌.

या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अकलूजमधील गांधी चौकात दररोज ट्रॅफिक जाम होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अकलूजमधील दररोजची अकलूज-पुणे व पुणे-अकलूज अवैध प्रवासी वाहतूक त्वरित थांबवून कारवाई करावी.

अन्यथा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दि. १३ सप्टेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज समोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

सदर निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर, ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व अकलूज यांना देण्यात आल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleAI-driven audio cloning startup gives voice to Einstein chatbot TechCrunch Web Story
Next articleअकलूज येथे गरोदर व बाळंतीण महिलांसाठी मोफत मार्गदर्शन, तपासणी व पौष्टिक आहाराचे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here