जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रयत्न, दोन वर्षातील वाहनांचा केला लिलाव…
अक्कलकोट (बारामती झटका)
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या पाच वाहनांचे लिलाव करण्यात आले आहेत. हि लिलाव प्रक्रिया राबविणारा अक्कलकोट तालुका जिल्ह्यात पहिला ठरलेला आहे. या माध्यमातून शासनाला चार लाखाचा महसूल मिळाला आहे. ही कार्यवाही सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब शिरसाट यांनी केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी आवाळे यांनी अक्कलकोट विभागाचे प्रांताधिकारी म्हणून काम करीत असताना कायद्याच्या चौकटीत बसवून जप्त केलेला वाहनांचे लीलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मागील दोन वर्षात अक्कलकोट तालुक्यातील भीमा, सिना नदीपात्रातून विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा प्रकरणात तत्कालीन तहसीलदार अंजली मारोड, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या कालावधीत टेम्पो, ट्रक, हायवा, ट्रॅक्टर अशी तब्बल २२ वाहने जप्त करण्यात आली होती. या लिलावात विना नंबर टेम्पो ६६ हजार, विना नंबर टेम्पो एक रक्कम १ लाख १७ हजार रुपये, टेम्पो एक ७८ हजार रुपये, विना नंबर टेम्पो रक्कम ५० हजार, विना नंबर टेम्पो रक्कम ७६ हजार रुपये असे पाच टेम्पोचे मिळून चार लाख रुपये इतका महसूल जमा झाली आहे. लिलाव प्रसंगी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा, संजय सोनटक्के आदी उपस्थित होते.
साडेनऊ लाख रुपये महसूल जमा
मागील दोन वर्षात २२ वाहने लिलाव करण्यात येणार आहेत, अशी जाहिरात दोन वेळा वृत्तपत्रात देताच धसका घेतलेल्या काही वाहनधारक दंडाची रक्कम भरून वाहने सोडवून घेऊन गेली. शासनाला साडेपाच लाख रुपये महसूल जमा झाला होता. पाच टेम्पोच्या लिलाव केलेल्या पाच वाहनाचे मिळून चार लाख असे एकूण साडेनऊ लाख रुपये महसूल जमा झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng