वाळू चोरी रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर शासनाच्या नव्या आदेशानुसार विनापरवाना गौण खनिज अथवा वाळूची वाहतूक करताना आढळल्यास ट्रॅक्टरला एक लाख, टिप्पर वा हायवाला 2 लाख तर जेसीबी ला सात लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय वाहनातील गौण खनिज वा वाळूच्या दराच्या पाचपट किमतीचा दंड आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार ठिकाणचे वाळू लिलाव झाले असून वाळू चोरी रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा यासंह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागील तीन वर्षात लिलाव न झाल्याने वाळू चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय पथकातील नियुक्त सदस्यांनी कारवायांची मोहीम हाती घ्यावी. सीमावर्ती भागातील गस्त वाढवून कारवाई करावी. पोलीस विभागाने शहर, ग्रामीणमध्ये वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात लिलाव झाले नसताना वाळू कोठून येत आहे ? याबाबतही महसूल विभागाने माहिती घेऊन कारवाई करावी. विनापरवाना उपसा होत असलेल्या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng