ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही
मुंबई (बारामती झटका)
सतत अपयशी योजना आणणाऱ्या पंतप्रधानांना ताळ्यावर येऊन देशाचा कारभार हाकण्याची गरज असून अग्निपथ योजना ही युवकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारी योजना आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी २० जूनला राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. यानुसार आज राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष झाली आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. CAA, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले. ७०० हून अधिक शेतकरी यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे का? जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही

देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
