पुणे (बारामती झटका) लोकमत साभार
अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोक !!!
जाईन गे माये तया पंढरपुरा,
भेटेन माहेर आपुलिया !!!
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९२ व्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत नयनांनी हा उभा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला. सायंकाळी आठच्या सुमारास माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले.
‘ज्ञानोबा – माऊली – तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे.

प्रस्थान सोहळ्यासाठी मंगळवारी (दि. २१) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुग्धारती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी बाराला ‘श्रीं’ ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला सुरू झाली. प्रथम मानाच्या ४८ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर वीणा मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुका विराजमान करण्यात आल्या.
त्यानंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी वारकर्यांनी टाळ, मृदुंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा – तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यांनी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, विठुनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला.

माऊलींच्या आषाढी पायी वारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ११ ब्रह्मवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजा समयी माऊलींचे साजिरे रूप आकर्षक दिसून येत होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
