द्राक्षबागासह गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांची काढणीची वेळ असताना हाताशी आलेला घास अवकाळी पावसाने घेतला हिसकावून…
माळशिरस ( बारामती झटका )
ऐन उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यातील द्राक्षबागांसह गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी एक एका संकटांना तोंड देत असताना अवकाळी पावसाचे नवे संकट अचानक समोर उभे राहिलेले आहे. वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने शेतकरी सध्या अस्वस्थ व अडचणीत दिसत असून त्याची पिके देखील धोक्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी देखील पुरेशी वीज मिळत नाही आणि त्यात थकित वीज बिलामुळे महावितरण वीज पुरवठा तोडत आहेत. या तणावात शेतकरी असतानाच पुन्हा निसर्गाचा अवकाळी पावसाने फटका बसू लागला आहे. काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. उन्हाळ्यामुळे तापमानात वाढ होत असतानाच अचानक हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ हवामान आणि हवेत गारवा निर्माण झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात या अवकाळी पावसाने आपली हजेरी लावून शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक धोका द्राक्ष बागांना झालेला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्षांचे होणारे नुकसान मोठे असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसाने पहिला फटका दिल्यानंतर आता पुन्हा अवकाळीची हजेरी लागू लागली आहे. मोठ्या कष्टाने व खर्च करून वाढवलेल्या द्राक्षबागा संकटात येत आहेत. शिवाय गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांची काढणीची वेळ आल्याने हाताशी आलेला घास हा अवकाळी हिसकावून घेत असल्याचे दिसत आहे. माळशिरस तालुक्यात विझोरी गावचे प्रगतशील बागायतदार सर्जेराव ज्ञानोबा काळे पाटील यांची बावीस एकर द्राक्ष बाग आहे. त्यामध्ये आर के, माणिक चमन, अनुष्का, एस एस एन. अशा नमुन्यांची द्राक्ष आहेत. त्यांना 85 एकर बागायती शेती आहे. मुलगा शंकरराव उर्फ केपी काळे पाटील आणि पैलवान गणेशआबा काळे पाटील शेती व्यवसायामध्ये सहकार्य करीत आहेत. केपी काळे पाटील यांनी एम. एस. सी. ऍग्री. शिक्षण इज्राईल येथे पूर्ण केलेले असल्याने आधुनिक टेक्नॉलॉजीने शेती सुरू आहे. शेतीमध्ये द्राक्षबागासह केळे, ऊस अशी पिके घेतली जातात. देशी गाईचा व म्हशीचा गोठा आहे. त्यांनी शेतीसाठी तीन कोटी लिटरचे शेततळे तयार केलेले आहे. बागेतील कामासाठी बाहेरील मजूर असतात. अशावेळी सिंधुताई सर्जेराव काळे पाटील ह्यासुद्धा कामगारांच्या पाठीमागे उभ्या राहून शेतीतील कामे व्यवस्थित करून घेत असतात. पैलवान गणेशआबा शेतीतील मशागती, औषध फवारणी या सर्व गोष्टी करीत असताना कधी कधी स्वतः ट्रॅक्टरवर बसून फवारा सुद्धा मारत असतात. दरवर्षी सोळाशे ते दोन हजार टन ऊस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्याशिवाय इतरत्र कोठेही देत नाहीत. उत्कृष्ट शेती करीत विझोरी गावचे सरपंच पद त्यांनी वीस वर्ष सांभाळलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची शेती काळे पाटील परिवार करीत असल्याने अवकाळी पावसात सुद्धा द्राक्ष बागेचे नुकसान झालेले नाही. सध्या त्यांच्या बागेमध्ये दीड ते दोन किलो वजनाचे द्राक्ष घड आहेत. परदेशांमध्ये त्यांची द्राक्ष नेहमी जात असतात. सध्या त्यांच्या बागेमध्ये व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू झालेली आहे. निसर्गावर सुद्धा काळे पाटील परिवार यांनी आधुनिक शेती करून मात केलेली आहे. वेळच्या वेळी औषध फवारणी मशागत केलेली असल्याने अवकाळी पावसापासून नुकसान कमी झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng