भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ युवा कीर्तनकार. ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे सुश्राव्य कीर्तन…
फलटण (बारामती झटका)
फलटण नगरीचे वैभव व विंचूर्णी गावचे आदर्श संस्थापक सरपंच, विविध १४ सहकारी संस्थांचे चेअरमन, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदे भूषविणारे, १७ पुस्तकांचे लेखक, कृषीरत्न, आदर्श शिक्षक, राष्ट्रपती पुरस्कारअशा विविध पुरस्काराने सन्मानित, फलटण बाजार समितीचे माजी सभापती, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राचे थोर अभ्यासक, विलक्षण प्रतिभासंपन्न लेखक व कवी, दीनदुबळ्यांसाठी कटिबद्ध असणारे समाजसुधारक, विज्ञानवादी संशोधक दृष्टिसंपन्न इतिहासतज्ञ, नाटककार (चागुना व जगु), आयुर्वेदाचार्य, आध्यात्मिक व अधिभौतिक विचारवंत अशा अनेक पैलुंनी संपन्न असलेले आदर्श अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणजेच स्व. प.पू. बापूसाहेब केशवराव निंबाळकर (बी.के. भाऊ) यांचे प्रथम पुण्यस्मरण तिथी प्रमाणे साजरे दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न झाले. स्व. बी.के. भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार. ह. भ.प. अमोल महाराज सुळ (मोरोची) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी फलटण तालुका व सातारा जिल्ह्यामधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ह. भ. प. अमोल महाराज यांनी बी.के. भाऊंच्या जीवनातील अनेक प्रसंग कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थापित केले व श्रोत्यांच्या अंत:करणामध्ये पूजनीय भाऊंच्या आठवणी जाग्या केल्या.

यावेळी महाराज सांगत होते की, फलटण तालुक्यातील निंबाळकर कुटुंबांमध्ये अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये बी.के. भाऊंनी आपल्या सदाचार संपन्न व्यक्तिमत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विंचुर्णी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध असणाऱ्या भाऊंनी श्रमदानातून रस्ते, कुटुंब नियोजन, विहिरीसाठी शेतकऱ्यास सर्वतोपरि मदत, बंधारे, वृक्ष लागवड, शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक सल्ला, सिमेंट व माती बंधारे यांची निर्मिती अशी अनेक कामे जातीने लक्ष देऊन मार्गी लावले आहेत. शिक्षक असताना श्रमदानातून रस्तेबांधणी, शेतीशाळा उभारणीसाठी अनुकूल कार्यतत्परता तसेच शेतीशाळेचे महाविद्यालय करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना सोबत घेऊन गावोगावी फिरून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व शिक्षणाची गोडी लावली. त्याचबरोबर शेती, विद्यालयामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षलागवड अशा विविध प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिकवणे व कोणत्याही परिस्थितीमधे विद्यार्थ्यांना सर्वतोपरि सहकार्य करणे व त्यांची काळजी घेणे हा त्यांच्यातील उत्तम शिक्षकाचा सद्गुण वाखणण्यासारखा होता. बाजार समितीमध्ये चेअरमन असताना
बाजार समितीच्या विकासासाठी तरडगाव, बरड, ढवळपाटी अशा विविध गावोगावी जाऊन जागा घेऊन सतत धावपळ करून उपबाजार समित्या निर्माण केल्या व बाजारसमितीला एक योग्य दशा व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाऊंनी केले. भाऊंनी आपल्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाने प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात घर केले आहे. मदतीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तिला भाऊंनी यथाशक्ती सहकार्य केले. कधीही काम न करता माघारी लावले नाही. भाऊंनी आपलं जीवन खूप खडतर प्रवासातून काढल आहे.
कीर्तनकारांनी कीर्तनातून अशाप्रकारे भाऊंचे जीवनपट उभा केला की श्रोत्यांच्या डोळ्यासमोर भाऊंचे जीवन उभे राहिले व त्यांचे समाजाप्रति असलेले कार्य जाणून श्रोत्यांनी साश्रूनयनांनी भाऊंप्रति सादर श्रद्धांजली समर्पित केली.

तुकाराम महाराजांच्या “तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे किर्ती मागे” या अभंगाची प्रचिती भाऊंच्या जीवनातून समाजाला मिळते. आज देहाने भाऊ आपल्यामध्ये नसले तरीही त्यांचे समाजोपयोगी कार्य कीर्तीरूपाने दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान आहे. खरेच भाऊंनी आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना मदत केली, आपले अखंड जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले. त्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली, झाडे लावून त्यांचं पालन केलं. बी.के. भाऊ यांनी १७ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी १४ पुस्तके प्रकाशित केली आहेत. पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित लोकांना त्यांच्या पत्नी सुमनमाला निंबाळकर, भाऊ श्री. शिवाजी निंबाळकर (तात्या), मुलगा श्री. सुशांत निंबाळकर, गणेश निंबाळकर, पुतणे श्री. दीपक व अजित निंबाळकर, कन्या रूपाराणी व गौरीताई, सुना सौ. अस्मिता निंबाळकर व सौ. वैशाली निंबाळकर, सौ. अश्विनी निंबाळकर, सौ. सुरेखा निंबाळकर, भाऊजय सिंधू काकी निंबाळकर, बहीण छबूताई, कन्या जोतीताई, राजवीर, शांभवी, सई, श्रीशा, माऊली, राधा, बाली, देवीना, कृष्णा, तसेच निंबाळकर कुटुंबाच्या व कदम कुटुंबातील डाॅ. हंनमतराव कदम, सौ. चित्रलेखा माने कदम, प्रतापसिंह कदम, भानुदास कदम, विलास कदम, विजय कदम, रवींद्रआणा भापकर, उदय जगताप, राजू शिदे, संजय ताकवले, महेश शिदे, शहाजी घाडगे, विजय तावरे, विरेंद्र कदम, हिंदराज कदम, आबाजी पोळ, कलपेश धुमाळ, अक्षय धुमाळ, शिवराज काकडे, प्रकाश सूर्यवंशी यांच्यावतीने भाऊंनी लिहिलेली पुस्तके आणि तुळशी वृंदावन वाटप केले. त्याचबरोबर कीर्तनासाठी उपस्थित असलेले भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था, झिरपवाडी या संस्थेसाठी रोख रक्कम देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील भाऊंचे मिञ, भाऊंचे विद्यार्थी मान्यवर, भाऊंनी काम केलेल्या संस्थेतील विविध कर्मचारीवर्ग, नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng