बीड (बारामती झटका)
”आई, तू रडतेयस का ?”
”अरे बाळा रडत नाहीये, कांदा चिरताना येतंच डोळ्यातून पाणी.”
”अगं, इतर भाज्या तू चिरतेस तेव्हा मग कसं नाही येत पाणी?”
”ते काय बाबा, मला माहीत नाही.”
छोट्या ओंकारचा आणि त्याच्या आईचा संवाद. त्यातून ओंकारचं समाधान काही झालं नाही. रात्रीही डोक्यात हाच विचार. उद्या शाळेत गेल्यावर सरांशीच बोलायचं त्यानं ठरवलं.
ओंकार अनिल शिंदे, बीड तालुक्यातल्या कुर्ला गावातला. शेतमजूर कुटुंबातला. जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकणारा. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचताच त्यानं राणे सरांना गाठलं. भाऊसाहेब राणे त्याचे विज्ञानाचे शिक्षक. ”सर माझी आई रोज रडते. कांदा चिरताना पाणी येतंच म्हणते ती.”
आईबद्दल वाटणारी ओंकारची काळजी बघून सरांना ओंकारचं कौतुक वाटलं. त्यांनी त्याला सविस्तरपणे समजावून सांगितलं. कारण तर कळलं, पण मग उपाय काय … ओंकारनं शोध घ्यायला सुरुवात केली. मार्गदर्शन करायला राणे सर होतेच. त्यातूनच कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही,असा स्मार्ट चाकू तयार केला.
कांदा आम्लयुक्त गुणधर्माचा. कांद्याची पीएच व्हॅल्यू पाच ते सहाच्या दरम्यान असून कांदा कापल्यानंतर त्याच्या पेशी तुटतात. त्याच्यामधून गंधकयुक्त द्रव्य बाहेर पडते. तो मुळात बाष्पनशील असल्यामुळे हवेत तरंगून हवेमध्ये पसरून डोळ्यापर्यंत पोचतो. डोळ्यातील पाण्याशी त्याचा संयोग झाल्यानंतर आम्ल तयार होतं आणि डोळे झरू लागतात. पण कांद्यातून बाहेर पडणारं बाष्पयुक्त गंधक ओंकारच्या स्मार्ट चाकूवर लावलेल्या हायस्पीड ड्रोन मोटरच्या फॅनच्या मदतीनं विरुद्ध दिशेला ढकललं जातं. त्यामुळे गंधकयुक्त द्रव आणि डोळ्याचा संपर्क होत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये पाणी येत नाही.
विशेष म्हणजे १६० रुपयांच्या साहित्यातून ओंकारनं हा चाकू तयार केला आहे. एक हायस्पीड ड्रोन मोटार, छोटा फॅन, एक इंच प्लॅस्टिक पाईप, वायर, प्रेस बटन, युएसबी सॉकेट, ३.७ व्होल्ट रिचार्जेबल बॅटरी, एलईडी लाईट या पाइपच्या मुठीवर वेगवेगळ्या प्रकारचे चाकू बसवता येतात. कांदा कापताना घरातील वीज अचानक गेली तर बोटे कापू शकतात. हा प्रसंग ओढवू नये म्हणून अचानक वीज गेल्यास ऑटोमॅटिकली या स्मार्ट चाकूवरील एलईडी सुरू होऊन कांदा कापता येतो. चार्जिंग युनिट आणि चाकू वेगळा करता येतो. त्यामुळे चाकू धुता येतो. त्याची घडीसुध्दा करता येते.त्यामुळे तो कुठेही नेता येतो. मोबाईलच्या चार्जरने तसाच छोट्या सोलर प्लेटने तो चार्ज करता येतो. चार्जिंग पूर्ण झाल्याची सूचना देण्यासाठी इंडिकेटर. एकदा चार्ज केल्यानंतर या चाकूने पाच ते सात किलो कांदे सहज कापता येतात.
ओंकारच्या आईच्या डोळ्यातून आता पाणी येतं ते त्याचं कौतुक ऐकूनच, कांदा चिरताना नाही ! बाबांनाही त्याचं कौतुक वाटतं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी ओंकारच्या स्मार्ट चाकूची निवड झाली आहे. महिन्याभरातच दिल्लीतल्या प्रगती मैदानावर हे प्रदर्शन होणार असून या प्रदर्शनात निवड झाल्यास जपानमधल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी तो जाणार आहे.

”ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कुशाग्रता, प्रतिभा असल्याचं ओंकारनं सिद्ध केलं आहे.” भाऊसाहेब राणे सर कौतुक करत होते. ”माझ्या संपर्कातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या सात मुलांनी राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्डला गवसणी घातली आहे. मला खात्री आहे, ओंकारची जपानला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी निवड होईल.”
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng