आजचा अर्थसंकल्प हा देशाला गती-शक्ती देणारा अर्थसंकल्प नसून देशाला अधोगतीकडे येणारा अर्थसंकल्प आहे – रविकांत वरपे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते मा.रविकांत वरपे यांची केंद्रीय अर्थसंकल्प – २०२२ वरील अधिकृत प्रतिक्रिया

मुंबई (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. कोणत्याही सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील जनतेच्या अपेक्षा व आकांक्षा पूर्ण करणारा असतो हे मोदी सरकारला अजूनही लक्षात आले नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात असणाऱ्या शेतकरी, कामगार, युवक, सर्वसामान्य लोकांना बुस्टर मिळण्याची अपेक्षा होती. परंतु या सर्वांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. मोदी सरकारचा आठवा अर्थसंकल्प म्हणजे मागील सात अर्थसंकल्पाचे पुढचे पाठ व मागचे सपाट असे आहे. आजचा अर्थसंकल्प हा देशाला शक्ती-गती देणारा अर्थसंकल्प नसून देशाला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा आत्मनिर्भर अर्थसंकल्प आहे, याचा अर्थ “तुमचे तुम्ही पहा” असा संदेश देशातील जनतेला दिला आहे.

४.५ कोटीपेक्षा जास्त कुटुंबे ही दारिद्र्यरेषेच्या खाली आली असून १३६ लाख कोटींचे कर्ज देशावर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोकांना रोजगार देणाऱ्या मनरेगाचे बजेट कमी केले आहे. आरोग्य, शिक्षण, सहकार, पर्यावरण, ग्रामीण भागातील उद्योग, सूक्ष्म-लघु उद्योग याबाबत काहीही ठोस तरतूद दिसत नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या सहकार आणि साखर उद्योगाला काहीही दिलासा या अर्थसंकल्पात दिलेला नाही. देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई शहराला केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. मुंबई, कोकण रेल्वे, राज्यातील राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्प यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केंद्र सरकारने या बजेटमध्ये केले आहे. देशाचे जीएसटी उत्पन्न वाढले असून आता केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पूर्ण पैसे वेळेवर राज्याला द्यावेत. देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबई व महाराष्ट्राला राजकीय आकस मनात धरून अर्थसंकल्पात दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची घोषणा मागील दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने केली होती, त्याचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाहीत. युवकांना २ कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनानंतर ६० लाख रोजगाराचे नवीन आश्वासन मोदी सरकारने दिले आहे. मनरेगाचे बजेट २५ हजार कोटींनी तर अन्नसुरक्षा योजनेचे बजेट ८० लाख कोटींनी कमी केले आहे. आजचे बजेट हे निधी वाढवण्याऐवजी कमी करण्यावर भर देणारे आहे. मध्यमवर्गीय जनतेची मोठ्या प्रमाणात मागणी असताना देखील या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अनियंत्रित क्रिप्टो मार्केटचे नियमन करण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्याऐवजी क्रिप्टो करन्सी उत्पन्नावर टॅक्स लावून आपली तिजोरी भरत आहे. सर्वसामान्य जनतेवरील महागाईचे ओझे वाढवून आपल्या निवडक मित्रांच्या हितासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जात आहे. ‘अमृतकाल’, ‘गतीशक्ती’ सारखे मोठे मोठे शब्द वापरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वजन वाढविण्याचा काहीच नसल्याने हा अर्थसंकल्प ठरला आहे.

केवळ डिजिटलच्या भ्रमात आणि ५ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले बजेट हे देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात लहान आणि सर्वसामान्य जनतेला न समजणारे बजेट आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केवळ ९० मिनिटात मांडला. हा अर्थसंकल्प देशाला डिजिटलच्या जाळ्यात अडकवणार असून आत्मनिर्भरच्या गोंडस नावाखाली केवळ आकड्यांची फेकाफेकी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभुमिअभिलेख कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार – भाजपा चिटणीस हनुमंत कर्चे.
Next articleफलटण तालुक्यातील मुंजवडी गावची कन्या माळशिरस नगरपंचायतची बनली नगरसेविका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here