माळशिरस (बारामती झटका)
डॉ. शंकरराव खरात हे माण देशातील व महाराष्ट्रातील बहुआयामी असे व्यक्तिमत्व असून यांचे कार्य व त्यांच्या कार्याचा ठसा विविध क्षेत्रात उमटलेला आहे, हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. तेव्हा त्यांचे स्मारक आटपाडी येथे व्हावे, ही मागणी सेंट्रल ह्यूमन राईटचे अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. शंकरराव खरात यांनी महाराष्ट्रात विविध पदावर आरुढ होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रिझर्व बँकेचे सदस्य, महाराष्ट्र शिक्षण कमिटीचे अध्यक्ष, सोशल सायन्सचे मानद सदस्य अशा अनेक शासकीय समितीवर त्यांनी काम केले आले आहे. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे दलित साहित्य समृद्ध केले आहे. ‘तराळ अंतराळ’ हे त्यांचे पुस्तक खूप गाजले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा त्यांचे योगदान आहे. त्यांचे कार्य पाहता पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही मानद पदवी बहाल केली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. १० कादंबऱ्या, ५ ललित, १२ कथासंग्रह आणि ८ विवेचन ग्रंथ एवढी ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माणदेशातील आटपाडी येथे म्हणजे त्यांच्या मूळ गावी भव्यदिव्य असे स्मारक सरकारने करावे व माननीय डॉ. शंकरराव खरात यांचा यथेच्छ असा सन्मान करावा. अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महोदय व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनाही दिले आहे. या निवेदनावर संघटनेचे कायदेतज्ञ ॲड. धनंजय बाबर व ह्यूमन राईट कार्यकारणी सदस्य बाळासो काटे आदींच्या सह्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng